Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Satara › ऊस वाहतुकीला कधी लागणार शिस्त?

ऊस वाहतुकीला कधी लागणार शिस्त?

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:52PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

ऊस गळीत हंगामात ऊस वाहतूकदार वाहतूक नियमांची पायमल्ली करत असल्याच्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रक शाखेच्या प्रयत्नाबरोबर आता वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

 ऊस गळीत हंगामात काही ऊस  वाहतूकदार जास्तीत जास्त ट्रॉली नेण्यावर भर देतात. ऊस तोड कामगार कारखान्याकडे वाहतूक करत असताना एका वेळी जास्त ट्रॉल्यांची नेˆआण करतात. अशी अवजड वाहतूक ऊस तोड कामगारांच्या जीवावर बेतत आहेत.  उसाची अवजड वाहतूक करताना अनेक वेळा अपघात घडण्याचे प्रसंग घडत आहेत. ऊसतोड कामगारांनी याबाबत योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तसेच अशा ऊस वाहतूकदारांबाबत कडक नियम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही अशा वाहतुकीदरम्यान सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज आहे. 

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमाचे कधीच पालन होत नाही. पोलिसांकडूनही अशा वाहतुकीकडे दुर्लंक्ष होत आहे. तसेच ट्रॅक्टर आणि ट्रकच्या मागेपुढे रिफ्लेक्टर लावलेले नसतात. त्यामुळे अन्य वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी अशा अपघाताचे प्रमाण  जास्तच  आहे.

ऊस वाहतुकीदरम्यान नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. काहींना चालत्या गाडीतून ऊस काढण्याची सवय असते. ही सवय अपघाताला निमंत्रण देऊ शकते. त्याबाबतही काळजी गरज आहे. तसेच वाहनधारकांनी ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांचा अंदाज घेऊनच आपली वाहने ओव्हरटेक करावीत. ऊस वाहतूकदारांनी देखील याबाबत योग्य ती काळजी घेतली तर अपघाताला पायबंद बसेल.