Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Satara › सातारा : विराज मोहिते यांची गोळी झाडून आत्महत्या

सातारा : विराज मोहिते यांची गोळी झाडून आत्महत्या

Published On: Mar 25 2018 10:02AM | Last Updated: Mar 25 2018 10:02AMरेठरे बुद्रुक : प्रतिनिधी

रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे युवकाने राहत्या घरी आत्महत्या केली. शनिवारी (दि. 24) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विराज हिंदुराव मोहिते (वय 38) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या धक्‍कादायक घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मोहिते-भोसले कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे संपूर्ण रेठरे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विराज मोहिते हे रेठरे बुद्रुक-पवार मळा येथील आपल्या बंगल्यामध्ये कुटुंबीयांसह राहत होते. गेली अनेक दिवसांपासून तेे निराश होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते, तर विराज मोहिते रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बंगल्यातील हॉलमधील सोप्यावर बसले होते. तर त्यांचा भाऊ आदित्य मोहिते हा आपल्या खोलीत होता. यावेळी घरात त्यांची आई व भावजयही होत्या. दरम्यान, अचानकपणे हॉलमधून मोठा आवाज आल्याने  आदित्यसह सर्वांनीच हॉलकडे धाव घेतली.

त्यावेळी विराज रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. गळ्यापासून वर कवटीकडे गोळीने वेध घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. विराज मोहिते यांनी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. ज्या रायफलमधून त्यांनी गोळी झाडली होती त्या रायफलचा परवानाही विराज यांच्याच नावे आहे. त्यांनी गळा व हानवटीच्या मध्ये रायफल धरून त्यातून वर कवटीच्या दिशेने गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.  

दरम्यान, कुटुंबीयांनी या घटनेची माहिती नातेवाइकांना व नंतर पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी  रायफल ताब्यात घेतली आहे. विराज मोहिते हे यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते यांचे चुलत भाऊ होत. तर, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचे ते चुलते होत. ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे बंधू हिंदुराव मोहितेयांचे विराज हे चिंरजीव होत. 

विराज यांच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवत कराड तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की नेमके कोणत्या कारणाने त्यांना नैराश्य आले होते यासह इतरही कारणांचा पोलिस तपास करत आहेत. याबाबत आदित्य हिंदुराव मोहिते यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

कृष्णाकाठ हादरला अन् ग्रामस्थांना धक्‍का...

आत्महत्या करण्यापूर्वी तसेच अलीकडील काही काळात विराज मोहिते हे मानसिक दबावाखाली होते, असे बोलले जात आहे. पूर्वी त्यांचा सार्वजनिक क्षेत्रात असलेला वावर अलीकडच्या काही काळात दिसत नव्हता. नैराश्यातून व मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली असताना विराज यांनी केलेल्या आत्महत्येमुळे रेठरेसह कृष्णाकाठ हादरला असून ग्रामस्थांना मोठा धक्‍का बसला आहे.

Tags : satara, viraj mohite, suicide, shooting, head