Tue, Feb 18, 2020 00:05होमपेज › Satara › ‘अर्स’चे वादळ घोंघावले; काँग्रेसमध्ये जिरवाजिरवी

‘अर्स’चे वादळ घोंघावले; काँग्रेसमध्ये जिरवाजिरवी

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 01 2019 9:08PM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

सत्तालोलूप राजकारण सुरु झाल्याने त्याचा सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरही विपरित परिणाम झाला. काँग्रेसमध्येच सुरु असलेली जिरवाजिरवी आणि त्यातच सत्‍तेसाठी नेताजीरावांच्या सुरु झालेल्या बेडूक उड्या आणि  गायवासरु, बैलजोडी, हाताचा पंजा अशा चिन्हांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला. त्याचदरम्यान शरद पवार यांची राज्याच्या राजकारणात एन्ट्री झाली. ‘पुलोद’चा प्रयोग झाला. 

कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्या अध्यक्षतेखाली अर्स काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी पवारांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्हा अर्स काँग्रेसच्या पाठीमागे कायम राहिला. मात्र, अर्स काँग्रेसच्या वादळातही 1980 साली झालेल्या निवडणुकीत सातारा, पाटण, खटावमध्ये ‘काँग्रेस आय’ची ज्योत तेवत राहिली.

सातार्‍यातील राजकरणात जनता पक्षाच्या अभयसिंहराजे भोसले यांनी वर्चस्व राखले होते. एकीकडे जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचा झंझावात सुरु असताना  राजघराण्याने सातारा मात्र ‘अजिंक्य’ ठेवला होता. त्यावेळी अर्स काँग्रेसने अभयसिंहराजेंच्या मागे फारसे न लागता गुरुवर्य बबनराव उथळे यांना उमेदवारी दिली. तर अभयसिंहराजेंना ‘काँग्रेस आय’ने तिकीट दिले. भाऊसाहेबांचा आठ हजार मतांनी विजय झाला होता.

कोरेगावात शंकरराव जगताप यांना चांगलाच राजकीय सूर सापडला होता.  भागवतराव देसाईंच्या विरोधात ठराव करुन जगतापअण्णांनी झेडपी ताब्यात घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांच्याशी झालेल्या जवळकीमुळे त्यांना ठरल्याप्रमाणे अर्स काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि जगतापअण्णा कोरेगावात दुसर्‍यांदा निवडून आले. अण्णांच्या विरोधात दत्‍ताजीराव भाऊसाहेब बर्गे यांनी ‘काँग्रेस आय’कडून अर्ज भरला. तर गुलाबराव माने, जयकुमार मोरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. याचा काहीच उपयोग झाला नाही. कोरेगावात जगतापअण्णांच्या विजयाची घौडदौड सुरु झाली होती.

फलटणमध्येही राजकीय सूत्रे बदलली होती. अर्स काँग्रेसने चिमणराव कदम यांना तिकीट दिले. त्याचवेळी ‘काँग्रेस आय’च्या खंबीर नेत्या असलेल्या प्रेमलाकाकी चव्हाण यांनी याच पक्षातून हिंदुराव नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले. यामध्ये चिमणरावांचा विजय झाला. हिंदूरावांचा तेव्हा पराभव झाला असला तरी चव्हाण आणि हिंदूराव नाईक-निंबाळकर घराण्यामध्ये ऋणानुबंध यानिमित्ताने निर्माण झाले.

माण मतदार संघावर सदाशिव पोळ यांचा नेहमीच प्रभाव राहिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विधानसभेची सूत्रे जुळवून तात्यांनी नेहमीच ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली. त्यामुळे तात्या ज्या काँग्रेसमध्ये जातील त्याच काँग्रेसचा झेंडा माणमध्ये फडकणार हे निश्‍चित होते. सदाशिवराव पोळ अर्स काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी विष्णूपंत  तातोबा सोनवणे यांना ‘अर्स’चे तिकीट दिले. ‘काँग्रेस आय’मधून गुंडोपंत बाळाजी माने लढले. भाजपमधून नितीन लवंगारे तर रिपब्लिकनमधून बाळासाहेब जावळे हे रणांगणात उतरले. मात्र, विष्णूपंत विजयी ठरले. 

खटाव मतदारसंघाच्या 1978 च्या निवडणुुकीत ‘काँग्रेस आय’मध्ये डेरेदाखल झालेल्या केशवराव पाटलांनी जनता पक्षातून लढणार्‍या चंद्रहार पाटलांना पराभूत केले होते. त्यानंतर त्यांचा या मतदारसंघात चांगलाच राजकीय दबदबा निर्माण झाला. केशवरावांनी 1980 साली पुन्हा ‘काँग्रेस आय’चीच उमेदवारी घेतली. त्यावेळी त्यांच्याविरोधात अर्स काँग्रेसकडून हणमंतराव जिजाबा  माने लढले. तर, बाबूराव आनंदराव जाधव यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. परंतु, अपेक्षेप्रमाणे केशवरावांचा विजय झाला. 

वाई विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय घमासान झाले होते. अर्स काँग्रेसने प्रतापराव भोसले यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात ‘काँग्रेस आय’ने मदनराव पिसाळ यांना उमेदवारी दिली. भाजपकडून गुलाबराव पवार यांना तर रामचंद्र गणपतराव ऊर्फ रामभाऊ भोसले यांनी जनता पक्षाकडून उमदेवारी दाखल केली. या निवडणुकीत प्रतापराव भोसले आणि मदनराव पिसाळ यांच्यातच टक्‍कर झाली होती. दोन्ही कुटुंबात उभे राहिलेले  राजकीय ‘बगाड’ तालुक्याने पाहिले आहे.

जावलीत झालेल्या निवडणुकीत तब्बल 11 उमेदवारांनी दंड थोपटले. या निवडणुकीत भिलारे गुरुजी असले तरी ही लढत झाली ती अर्स  काँग्रेसमधून लढलेले धोंडिबा कदम ऊर्फ डी. बी. कदम व बाळकृष्ण अनंत ऊर्फ किसनराव साबळे-पाटील यांच्यामध्येच. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत डी. बी. कदम यांचा दीड हजार मतांनी विजय झाला. किसनरावांची ही शेवटची निवडणूक ठरली.

कराड उत्‍तरेचा गड यशवंतराव चव्हाण यांनी कायमच राखला. 1980 ला या मतदारसंघातून बाळासाहेब पाटील यांचे वडील पी. डी. ऊर्फ पांडुरंग दादासाहेब पाटील यांना अर्स काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात ‘काँग्रेस आय’कडून जयसिंग बाबूराव लाड तर शेतकरी कामगार पक्षातून केशवराव पाटलोजी पवार यांनी उमेदवारी दाखल केली. 1978 च्या निवडणुकीत आघाडीवर असलेल्या केशवराव पवारांचा जोर ओसरला. त्यामुळे या निवडणुकीत पी. डी. पाटील यांचा मोठ्या फरकाने विजय झाला.

कराड दक्षिणच्या राजकारणातही मोठी उलथापालथ झाली होती. अर्स काँग्रेसने विलासराव पाटील-उंडाळकरांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात ‘काँग्रेस आय’ने निकम बाळकृष्ण परसू ऊर्फ बाळासाहेब पाटील शेरेकर यांना उमेदवारी दिली. तानाजी कांबळे रिपब्लिकनमधून लढले. तर भीमराव खाशाबा पाटील, भीमराव धोंडिराम पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. विलासकाका उंडाळकरांनी बाळासाहेब शेरेकरांना एकहाती लोळवले. या निवडणुकीच्या निमित्ताने कराड दक्षिणेत विलासकाकांच्या रुपाने राजकारणातील ‘किंग’ उदयास आला.  

पाटणमध्ये जनता पक्षातून विजयी झालेल्या बाळासाहेब देसाईंनी ‘काँग्रेस आय’मधून निवडणूक लढवली. बाळासाहेबांचा विजयाचा वारु रोखण्यासाठी अर्स काँग्रेसने विक्रमसिंह पाटणकरांना तिकीट दिले. पाटणकरांना तात्यासाहेब दिवशीकर यांचीही साथ मिळाली. या मतदारसंघावर असलेल्या पकडीच्या मानाने पाटणकरांनी जोरदार लढत दिली. बाळासाहेबांचा निसटता विजय झाला. या निवडणुकीनंतर मात्र, या तालुक्यात देसाई-पाटणकर असे गटातटाचे सुरु झालेले राजकारण आजपर्यंत सुरु आहे. 
(क्रमश:)