Fri, Jun 05, 2020 23:16होमपेज › Satara › बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी कसरत; पवारांचा याला फोन, त्याला फोन

बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी कसरत; पवारांचा याला फोन, त्याला फोन

Published On: Oct 05 2019 12:33AM | Last Updated: Oct 05 2019 12:33AM

शरद पवारसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील खासदारकीसह सर्व जागा जिंकण्यासाठी सलग दोन दिवस सातार्‍यात फिल्डिंग लावली. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पवारांचे ‘याला फोन लाव, त्याला फोन लाव’ असे सुरू होते. माणचे ढीगभर उमेदवार भेटायला आल्यानंतर पवार कावले. त्यांची चिडचिड पाहता पवारांना बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दोन दिवसांत दिसले.  

शरद पवार गुरुवारी सायंकाळी सातार्‍यातील हॉटेल प्रीती येथे मुक्‍कामी होते. ते आल्यानंतर राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांसह राजकीय मंडळींचा लवाजमा त्यांना भेटण्यास येत होता. शरद पवार यांनी येणार्‍या काही मोजक्या पदाधिकार्‍यांची पहिली बैठक कॉन्फरन्स हॉलमध्ये घेत सध्याची परिस्थिती जाणून घेतली. इतर पक्षाचे लोक नक्‍की काय करत आहे. त्यांची काय रणनीती सुरु आहे हे जाणून घेतले. राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांशी सुमारे पाच तास नॉनस्टॉप खलबते केली. जिल्ह्यातील जनमताचा कानोसाही घेतला. उपस्थितांना राजकीय व्यूहरचना आखून देत काही कानमंत्रही दिला.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला आहे, तो शाबूत राहायलाच हवा. भाजपचे काही लोक बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तसे होता कामा नये, रात्र वैर्‍याची असून हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्‍लक आहेत. त्यामुळे जीवाचे रान करा आणि सातारा लोकसभेसह सर्व विधानसभेच्या जागा जिकून आणाच, असे ते पदाधिकार्‍यांना सांगत होते. माणच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे डोके फिरवले. त्यामुळे पवार कावल्यागत करत होते. मध्यरात्रीपर्यंत त्यांनी अनेकांना फोन लावले. भाजपमुळे सातार्‍याचा बालेकिल्ला हातातून जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पवार कसरत करताना दिसले.

शुक्रवारी त्यांनी  शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी कोरेगवाकडे धाव घेतली. प्रचंड गर्दीत गाडी अडकल्याने पवार पुन्हा वैतागल्यासारखे दिसले. मात्र, तरीही त्यांनी शशिकांत शिंदे यांना ताकद दिली.