Tue, May 26, 2020 17:34होमपेज › Satara › यशवंतरावांच्या जिल्ह्यात पवारांचा करिष्मा

यशवंतरावांच्या जिल्ह्यात पवारांचा करिष्मा

Published On: Oct 03 2019 2:16AM | Last Updated: Oct 02 2019 9:10PM
सातारा : प्रतिनिधी

‘अर्स’ काँग्रेसच्या प्रयोगानंतर सातारा जिल्ह्यात समाजवादी काँग्रेसचा झंझावात सुरू झाला. शरद पवारांना सातारा जिल्ह्याची नस सापडली ती याच 1985च्या निवडणुकीत. प्रतापराव भोसले, श्रीमंत अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील- उंडाळकर असे मातब्बर नेते असतानाही  शरद पवारांनी तरुण पिढीला बरोबर घेतले. पवारांच्या ‘काँग्रेस एस’चा झंझावात मोठा होता. त्यांना पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर, माणमधून विष्णुपंत सोनवणे, कराड उत्तरमधून श्यामराव अष्टेकर असे तिहेरी यश मिळाले तर फलटणमधून चिमणराव व खटावमधून भाऊसाहेब गुदगे हे दोघे अपक्ष निवडून आले.

1085 ते 1990 या पाच वर्षात महाराष्ट्राने 3 जून 1985 शिवाजीराव पाटील निलंगेकर, 12 मार्च 1986 शंकरराव चव्हाण, 26 जून 1988 शरद पवार अशा तिन तारखांना तीन मुख्यमंत्री पाहिले. जिल्ह्यात अष्टेकरांच्या रुपाने एकच लाल दिवा होता. कमी मंत्रिपदावर काम करण्याची सवय तेव्हापासून जिल्ह्याला लागली.

काँग्रेस अर्सच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या होत्या. राजकारणातल्या सख्ख्या मित्रांमध्ये प्रचंड वैर निर्माण झाले होते. तर, कित्येक वर्षाचे वैरी मांडीला मांडी लावून बसले होते. काँग्रेसच्या अन् पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाचे दोन  प्रमुख आधारवड गळून पडले. किसन वीर तथा आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील राजकारण्यांना बांधून ठेवणारी दोरी हरपली होती. शरद पवारांच्या धोरणी राजकरणाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत होता. 

फलटण मतदारसंघात चिमणराव कदम यांची पकड मजबूत झाली  होती. चिमणरावांनी अर्स काँग्रेस आणि काँग्रेस आय या दोन्ही काँग्रेसचे तिकीट नाकारुन अपक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. तरीही चिमणराव मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांना 46210 मते मिळाली. तर, इंडियन काँग्रेसचे राजाराम सखाराम ऊर्फ बॅ. राजा भोसले, इंडियन नॅशनल काँग्रेसचे बाबासाहेब मोरे अशा विरोधकांच्या मतांची बेरीज चिमणरावांच्या मतांइतकीही झाली नाही. भोसले यांना 35992 तर मोरे यांना 6595 मते मिळाली. 

माण विधानसभा मतदारसंघात इंडियन नॅशनल काँग्रेसचे गुंडोपंत बाळाजी माने व शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे विष्णू सोनवणे यांच्यात जोरदार लढत झाली. माने यांनी निकराची झुंज देवूनही सोनवणे यांचा  41 हजार 92 मतांनी विजय झाला. तर, माने यांना 32523 मते मिळाली. 

खटाव तालुक्यावर वर्चस्व ठेवणार्‍या केशवराव पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या गटातील मोहनराव तथा भाऊसाहेब गुदगे यांच्याकडे होती. तेच  बिनीचे प्रचारक होते. या निवडणुकीत  गुदगेंनी घेतलेल्या सभा सुरुवातीला केशवरावांसाठी आहेत असेच वाटायचे. मात्र, त्यानंतर सभेत भाऊसाहेब गुदगे झिंदाबाद अशी घोषणा घुमायची. काँग्रेस आयमधून केशवराव लढत असताना भाऊसाहेबांनी अपक्ष अर्ज भरला व मोठ्या फरकाने ते निवडून आले. केशवरावच काय पण, मतदारांनाही राजकारण लक्षात यायच्या आतच भाऊसाहेब आमदार झाले. गुदगेंच्या निवडणूक तंत्राचे किस्से आजही चवीने सांगितले जातात.

कराड उत्तर मतदारसंघात श्याम अष्टेकर ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण या सच्च्या कार्यकर्त्याला संधी देवून शरद पवारांनी किमया केली. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल जिल्ह्यात धक्कादायक मानला गेला. काँग्रेस एसने श्याम अष्टेकर नावाच्या सच्च्या कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष करत पुढे आमदारकीचे तिकीटही दिले. पी. डी. साहेबांनी काँग्रेस आयमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पूर्वी सत्तेत असल्याने तेच निवडून येणार, असे निश्चित  होते. परंतु, काल-परवापर्यंत सायकलवरुन फिरणार्‍या श्याम अष्टेकरांचा धक्कादायक विजय झाला. अष्टेकरांना 48 हजार 134 तर पी. डी. पाटलांना 40 हजार 978 मते मिळाली.  मुख्यमंत्री झाल्यावर शरद पवारांनी याच कार्यकर्त्याला 1988 साली  क्रीडा राज्यमंत्रिपद बहाल करत  त्यांचा यथोचित गौरवही केला.

कराड दक्षिण मतदारसंघात मोहिते-भोसल्यांचे राजकारण मोडीत काढून विलासकाका उंडाळकरांनी आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. विलासकाकांना काँग्रेस आयने तिकीट दिले तर विलासराव पाटील-वाठारकरांना शरद  पवारांनी  तिकीट दिले.  अत्यंत चुरशीने झालेल्या या लढतीत  उंडाळकरांना 54 हजार 159 तर वाठारकरांना 42 हजार 390 मते मिळाली. विलासराव पाटील-उंडाळकर विजयी झाले. त्यानंतर दोन्ही विलासरावांमध्ये दक्षिणेत दीर्घकाळ घमासान होत राहिले. मात्र, उंडाळकरांनी लोकसभा लढवून पहिला पराभव पाहिला. 

पाटण विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली होती. त्याठिकाणी सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आणि त्यातून पुढे मोठे सत्तांतर झाले. बाळासाहेब देसाई यांच्यानंतर या मतदार संघावरील देसाई घराण्याची पकड सैल झाली होती. बाळासाहेबांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शिवाजीरावांनी विक्रमसिंहांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, पाटणच्या राजकारणात पाटणकर घराण्याचा उदय झाला होता. 1982 साली झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर यांना 43 हजार 608 तर इंडियन काँग्रेसकडून निवडणूक लढलेले शिवाजीराव दौलतराव देसाई यांना 32 हजार 364 मते मिळाली होती. त्यानंतर लगेच 1985 साली निवडणूक लागली. त्यात इंडियन नॅशनल काँग्रेसकडून शिवाजीराव देसाई निवडणूक लढले तर विक्रमसिंह पाटणकर यांनी काँग्रेस एसचा झेंडा हातात घेतला. या लढतीमध्येही देसाईंचा पराभव झाला. त्यांना 36 हजार 930 मते मिळाली तर विक्रमसिंह पाटणकर 48 हजार 873 मतांनी विजयी झाले.

वाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आयच्या प्रतापराव भोसलेंचा बोलबाला होता. त्यामुळे मदनराव पिसाळ यांचे तिकीट व विजय निश्चित मानला जात होता. शरद पवारांच्या साथीने अरविंद चव्हाणांनी पिसाळांना जेरीस आणले होते. चव्हाणांना काँग्रेस एसचे तर पिसाळांना इंडियन नॅशनल काँग्रेसचे तिकीट मिळाले. भारतीय काँग्रेसकडून सर्जेराव मोरे यांनी लढत दिली. या निवडणुकीत मदनराव पिसाळ विजयी झाले. त्यांना 38 हजार 74  मते मिळाली. तर अरविंद चव्हाण यांना 37 हजार 231 मते मिळाली. 

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शंकरराव अण्णांचा दबदबा निर्माण झाला होता. त्यांची विजयी घौडदौड रोखणे त्याकाळात कुणालाच जमले नाही. इंडियन नॅशनल काँग्रेसमधून निवडणूक लढणार्‍या अण्णांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस एसने (समाजवादी काँग्रेस) शिवाजीराव गोविंदराव फाळके यांना तिकीट दिले. पण, फार्मात असलेल्या अण्णांपुढे फाळकेंचा टिकाव लागला नाही. जगतापअण्णांना 48 हजार 49 मते मिळाली. तर फाळकेंना 33 हजार 165 मते मिळाली. पुढे अण्णांना विधानसभेचे सभापतीपद मिळाले.

जावली मतदारसंघावर शरद पवारांचे बारीक लक्ष होते. मात्र, ही निवडणूक अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डी. बी. कदमांनी सहज जिंकली. त्यांच्या विरोधात भाजपाकडून मारुती फाळके, अपक्ष म्हणून कुडाळचे लालसिंगराव बापूसाहेब शिंदे, साहेबराव बिरामणे उभे होते. डी. बी. कदमांना 43 हजार 57 मते मिळाली. तर लालसिंगराव शिंदे यांना 24 हजार 429 मते मिळाली होती.  मात्र, डी. बी. कदमांच्या अपघाती निधनाने त्याठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक लागली. जी. जी कदम यांच्याविरुध्द बबनराव बडदरे यांच्यात ही लढत झाली. शरद पवार यांच्या प्रचाराला यश आले नाही. त्यांनी बडदरेंसाठी स्वत: वाहन चालवत घर टू घर प्रचार केला होता. मात्र, तरीही गेणूजी गोविंद ऊर्फ जी. जी. कदम विजयी झाले. त्यांना 46 हजार 383 मते मिळाली.   

शिवसेनेचे सदाशिव सपकाळ यांना 20 हजार 662,  अपक्ष साहेबराव पवार यांना 17 हजार 962 तर जनता दलाचे बाळकृष्ण साबळे यांना 7 हजार 386 मते मिळाली. सातारा  विधानसभा मतदार संघावर श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांचाच वरचष्मा राहिला. त्यावेळी दादाराजे खर्डेकर काँग्रेस एसचे जिल्हाध्यक्ष होते तर  अभयसिंहराजे भोसले काँग्रेस आयमधून निवडणूक लढवत होते. त्यावेळी अभयसिंहराजेंच्या विरोधात अरविंद गवळींना तिकीट द्यावे, अशी शरद पवारांची  इच्छा  होती. परंतु, दादाराजे खर्डेकरांच्या आग्रहावरुन काँग्रेस एसने गवळींऐवजी सर्जेराव जाधव यांना तिकीट दिले. या खेळीमुळे भाऊसाहेब महाराजांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुखकर झाला. भाऊसाहेब महाराजांना 60 हजार 677 मते मिळाली तर सर्जेराव जाधवांना केवळ 26 हजार 757 मते मिळाली. अपक्ष प्रभाकर देशमुख  ऊर्फ भय्यासाहेब यांना 207 मते मिळाली होती.
(क्रमश:)

प्रचारासाठी जाताना नेते घरूनच जेवणाचा डबा घेऊन निघत

शरद पवारांचा सातारा जिल्ह्यातील संपर्क दांडगा होता. त्यामुळे नव्या औषधाची चाचणी यशस्वी करण्यासाठी सातारा नावाचे गिनिपिग त्यांच्यासाठी खुलेच होते. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मोठ्या पदावर पोहोचले होते. जिल्ह्यावर होल्ड ठेवण्याची ताकद त्यांना प्राप्त झाली होती. समाजवादी काँग्रेस हा पक्षच पूर्णत: नवीन होता, त्यामुळे प्रचारात फारसे मुद्दे नव्हते. स्थानिक मुद्यांना हात घालून शरद पवार रान उठवत होते. दादाराजे खर्डेकरांनी समाजवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर घेतलेले परिश्रम आजही अनेकांना आठवतात. सकाळी घरातून भाकरी बांधून घेवून निघायचे ते रात्री अपरात्री घरी परतायचे, असा त्यांचा नित्य कार्यक्रम होता.त्याकाळी इतर नेतेही प्रचारासाठी जाताना घरुनच जेवणाचा डबा घेऊन जात असत...!