Fri, Jun 05, 2020 12:06होमपेज › Satara › गुपचूप चालणार्‍या जेवणावळींवर ‘वॉच’

गुपचूप चालणार्‍या जेवणावळींवर ‘वॉच’

Published On: Sep 29 2019 1:37AM | Last Updated: Sep 29 2019 1:37AM
सातारा : प्रतिनिधी

सर्वसामान्य मतदाराला भयमुक्‍त  वातावरणात मतदान करता यावे यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच आमिष, प्रलोभन दाखवणे राजकीय पक्ष किंवा त्यांच्या उमेदवारांना महागात पडू शकत. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रात्री दहा वाजण्यापूर्वी प्रचार आटोपावा लागणार आहे. हॉटेल्स, ढाबे बंद ठेवावे लागणार आहे. लपूनछपून चालणार्‍या जेवणावळींवर प्रशानाने तैनात केलेल्या भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून सुरु असलेल्या मोर्चेबांधणीमुळे वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुकीत आचारसंहितंचे उल्‍लंघन होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. आचारसंहिता  काळात जरी प्रचार करता येत असला तरीही आचारसंहितेमध्ये नागरिकांचाही विचार करण्यात आला आहे. कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवण, थांबवणं बंधनकारक करण्यात आले आहे. रात्रीचा प्रचार न थांबल्यास संबंधित उमेदवार किंवा पक्षाला कारवाईला समोरे जावे लागणार आहे.

जिल्ह्यात रात्रीच्यावेळी हॉटेल्स बंद राहणार असल्याने जेवणावळींना पायबंद बसणार आहे. मात्र, काही उमेदवारांकडून प्रशासनाला गुंगारा देवून प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी किंवा मतदारांसाठी मंगल कार्यालये, शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, शहराबाहेर आडोशाला असणारे ढाबे, हॉटेल्सवर जेवणाचे बेत ठेवले जातात.  हे कृत्यसुध्दा आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरु शकते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या सर्व ठिकाणांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांपैकी कुणाकडून आचारसंहितेचे उल्‍लंघन होणार नाही यासाठी अलर्ट रहावे लागणार आहे. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, कटआऊट, होर्डिग्ज रस्त्याच्या बाजूला, चौका-चौकात, इमारतींवर, सरकारी कार्यालयांवर राजरोसपणे लावली जातात. असे फलक लावण्यासाठी आयोगाने नियम बनवले आहेत.

नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही. तसेच कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचार सभांमध्ये, मिरवणूकांमध्ये, भाषणांमध्ये कसल्याच प्रकारचा अडथळा आणण्याचा अधिकार नाही. एकाच दिवशी संबंधित पक्षांच्या सभा असतील तर त्यांच्या वेळा बदलून द्याव्या लागणार आहेत. तरीही एकमेकांच्या सभांमध्ये  कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास  त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासंदर्भातील सर्व परवानग्या प्रशासनाकडून मिळवाव्या लागणार आहे. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे.     (क्रमश:)

आमिष दाखवणं पडू शकतं महागात

कोणत्याही निवडणूकीच्या प्रचारात भ्रष्टाचाराला काडीमात्र स्थान नसतं. मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू भेट म्हणून देणे, मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवणं किंवा लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. यापैकी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास किंवा उमेदवारांकडून, राजकीय पक्षांकडून अशी कोणतीही कृती घडल्यास ते आदर्श आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरते. त्यामुळे अशा  गोष्टी प्रत्येक उमेदवारांनी आणि पक्षाने लक्षात ठेवून आचारसंहितेचे उल्‍लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर अमिष दाखवणं एखाद्या नेत्याला चांगलंच महागात पडू शकतं.