Sat, Jun 06, 2020 01:02होमपेज › Satara › हाय व्होल्टेज मुकाबल्यात कोण मारणार बाजी?

हाय व्होल्टेज मुकाबल्यात कोण मारणार बाजी?

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 8:20PM
प्रतिनिधी : सातारा 

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उत्कंठा ताणलेला माण-खटाव हा बहुचर्चित मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला गेला आहे. पक्षाकडून माजी आमदार जयकुमार गोरे यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या शेखर गोरेंनी जनता हेच माझे तिकीट, असे सांगून रिंगणात  शड्डू ठोकला आहे. ‘आमचं ठरलंय’च्या गोटातून अनिल देसाईंचे नाव जाहीर झाले असले तरी लोधवडेकर आणि निमसोडकर-देशमुखांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन सस्पेन्स वाढवला आहे. राष्ट्रवादी उमेदवार देणार की घड्याळ चिन्हच मतदार संघातून गायब होणार, यावर हाय व्होल्टेज मुकाबला तिरंगी की चौरंगी, हे ठरणार आहे.

माण-खटाव मतदार संघावर भाजप, शिवसेना आणि रासप या युतीच्या घटकपक्षांनी दावा सांगितला होता. मंत्री महादेव जानकर यांनी माण आमची जान असल्याचे सांगत या मतदार संघातून रासपचाच उमेदवार उभा राहील, अशी भीमगर्जना केली होती. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शेखर गोरे यांना ‘मातोश्री’वरून लढण्याची तयारी करण्याचे सांगण्यात आले होते, तर माजी आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माण मतदारसंघ भाजपलाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. युतीच्या सर्वच घटक पक्षांकडून माणवर दावा सांगितला गेल्याने, सर्वच इच्छुकांच्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनात संभ—म निर्माण झाला होता. भाजपने मात्र आपल्या पहिल्याच यादीत युतीतून माण मतदारसंघ भाजपला मिळाल्याचे जाहीर केले.  

जयकुमार गोरे यांचे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नावही जाहीर करण्यात आले. शिवसेनेत गेलेल्या शेखर गोरेंना या निर्णयाने धक्का दिला. त्यांनी ‘मातोश्री’ला शिवसेना प्रवेशावेळी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहेे. त्यांनी अद्याप प्रयत्न सोडले नाहीत. तिकीट मिळो अथवा न मिळो, जनता हेच माझे तिकीट असल्याचे सांगत, त्यांनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला आहे.

अनेक दिवस चर्चेच्या फेर्‍या झाल्यानंतर ‘आमचं ठरलंय’ टीमचे एकदाचे आता ठरले आहे. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाईंचे नाव टीमने निश्चित केले आहे. देसाईंचे नाव जाहीर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी लोधवडेकर प्रभाकर देशमुख आणि निमसोडकर रणजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. प्रभाकर देशमुखांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला असल्याने सर्वपक्षीय ‘ठरलंय’वाल्यांच्या माण-खटाव विकास आघाडीत फूट पडणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळू लागल्या आहेत. रणजित देशमुखांवरही कार्यकर्त्यांनी चांगलाच दबाव टाकला आहे. दोन्ही देशमुखांच्या भूमिकेवर आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

जयकुमार गोरेंना टार्गेट करत सर्व विरोधकांचे व्यूहरचना आखायचे काम सुरू आहे. शेखर गोरे काहीही झाले तरी निवडणूक लढणारच आहेत. आता देसाई, दोन्ही देशमुख, प्रभाकर घार्गे, पोळ बंधू आणि त्यांचे सहकारी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात की त्यांच्यामध्ये बंडखोरी होते, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत. 

जयकुमार गोरेंनी गावभेट दौर्‍याच्या निमित्ताने मतदारसंघ ढवळून काढला आहे. दोन वेळा शक्तिप्रदर्शन केले आहे. शेखर गोरेंनीही मतदार संघात रान उठवत महिला मेळाव्याद्वारे मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. ‘आमचं ठरलंय’ टीमचा मात्र ठरवण्यातच वेळ चालला आहे. वंचितकडूनही उमेदवार दिला जाणार आहे. काहींनी अपक्ष लढायची तयारी केली असली, तरी माणचा हाय व्होल्टेज मुकाबला गोरे बंधू, ‘आमचं ठरलंय’ टीममध्येच रंगणार आहे.

    प्रभाकर देशमुखांचा आमचं ठरलंयला दणका

    मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार का?