Fri, Jun 05, 2020 11:00होमपेज › Satara › काँग्रेसची ताकद वाढली; भाजप-सेनेचेही बाळसे

काँग्रेसची ताकद वाढली; भाजप-सेनेचेही बाळसे

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 9:11PM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात 1990 ची निवडणूक भलतीच लक्षवेधक ठरली होती. समाजवादी काँग्रेस विलीन झाल्यामुळे जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली. याच दरम्यान स्थापन झालेली शिवसेना व त्यानंतर राज्यात आलेल्या भाजपाने बाळसे धरले. या पक्षांचे लोण शहरापुरते मर्यादित न राहता गावागावात पसरले होते. अशा परिस्थितीत माणच्या अपक्ष धोंडिराम वाघमारेंचा अपवाद वगळता जिल्ह्यातील 9 जागांवर हाताचा ‘पंजा’ घट्ट  झाला. बंडखोरांचे पीक येऊ लागले तरी ते प्रस्थापितांना धक्का लावू शकले नाहीत. मात्र अभयसिंहराजे  भोसले यांच्या विरोधात राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी टक्कर दिल्याने 1990 ची विधानसभा निवडणूक राज्यात लक्षवेधक ठरली.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा विलासराव पाटील उंडाळकरांवर विश्वास दाखवत तिकीट दिल्याने मोहिते-भोसलेंनी बंडाचे निशाण फडकावले. विलासकाकांच्या राजकारणाची चुणूक एरव्ही सर्वांना आली होती. मात्र तरीही  इंद्रजित यशवंतराव मोहिते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख चंद्रकांत पवार यांनीही दंड थोपटले. या मतदारसंघात उंडाळकरांची ताकद असल्याने त्यांनी मोहिते-भोसलेंचा चांगलाच बंदोबस्त केला. उंडाळकरांचा पराभव करण्यासाठी दोन्ही घराण्यांनी एकत्र येऊन जंगजंग पछाडले तरीही त्याचा उपयोग झाला नव्हता. या निवडणुकीत उंडाळकर विजयी झाले.  

डॉक्टर मोहिते  नवखा उमेदवार, उच्चविद्या विभूषित या निर्देशावर लढले. कराड उत्तरमध्ये एस काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शामराव अष्टेकर मागीलवेळी विजयी झाले. पवारांच्या कृपेने मंत्रिपदाचा लाल दिवा घेवून कराडात फिरणार्‍या अष्टेकरांना मात्र ही निवडणूक अवघड गेली. शरद पवारांनी पी. डी. पाटलांना बंडखोरीपासून रोखले. त्यामुळे अष्टेकरांचा एकहाती विजय झाला. 

पाटण विधानसभा मतदारसंघावर   आपली पकड अबाधित ठेवण्यात यशस्वी झालेल्या बाळासाहेब देसाई यांच्यानंतर मात्र त्याठिकाणी शिवाजीराव देसाई यांनाही फारसे यश आले नाही. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिकीट विक्रमसिंह पाटणकरांना शरद पवारांच्या जवळकीमुळे मिळाले. यावेळी शिवाजीराव देसाईंचे निधन झाले होते. त्यामुळे कारखाना गटाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी   बाळासाहेब देसाईंच्या स्नूषा तथा शिवाजीरावांच्या पत्नी विजयादेवी देसाई यांनी पाटणकरांना टक्कर दिली. याचवेळी शंभूराज देसाईंची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. या लढतीत  विक्रमसिंहांनी 22 हजाराच्या फरकाने  विजय मिळवला. त्यांना 62 हजार 647 मते मिळाली. तर विजयादेवी देसाईंना 40 हजार 3  तर भाजपाचे प्रल्हाद मोरेंना 1 हजार 994 मते मिळाली होती. 

सातारा विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांचे प्राबल्य निर्माण झाले होते. त्यांना राजकीय शह देण्यासाठी त्यांच्याच थोरल्या वहिनी म्हणजे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी शिवसेनेकडून प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. राजघराण्यातील दोन व्यक्तींमध्ये होणार्‍या या निवडणुकीमुळे सातार्‍याच्या या निवडणुकीला वेटेज आले. राजमातांच्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांनी गर्दीचा उच्चांक मोडून काढला. तरीही अभयसिंहराजे भोसले यांचे मताधिक्क्य कमी झाले नव्हते. अभयसिंहराजे भोसले या निवडणुकीत विजयी झाले. 

जावली विधानसभा मतदारसंघात पुन्हा जोरदार राजकीय घडामोडींनी   धाकधूक वाढवली. डी.बी.कदमांच्या निधनानंतर एकसंघ झालेल्या काँग्रेसने पुन्हा  गेणूजी गोविंद तथा जी. जी. कदम यांना उमेदवारी दिली. या कदमांच्या विरोधात पुन्हा शिवसेनेच्या सदाशिव सपकाळ यांनी आव्हान दिले. कराड उत्तरमध्ये अष्टेकरांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला एस. काँग्रेसमधून पवारांनी दिलेल्या संधीनंतर सेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा केलेला जिल्ह्यातील दुसरा प्रयोग. पै. साहेबराव पवारांची बंडखोरी जावलीत चर्चेचा विषय बनली तरी त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे जी. जी. कदम यांचा विजय झाला. 

खटाव विधानसभा मतदारसंघावर ‘आयडिया’ करुन अपक्ष म्हणून  आमदारकी मिळवलेल्या भाऊसाहेब गुदगेंना या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृत तिकीट दिले. तर जनता दलने अरुण बागलांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले. शिवसेनेच्या शिवाजीराव नानासो जाधव यांनीही लढा दिला. मात्र, काँग्रेस एकसंघ झाल्याने भाऊसाहेबांचा सहजरित्या  पुन्हा विजय झाला. 

फलटण विधानसभा मतदारसंघात पुन्हा चुरस पहायला मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उभे असलेल्या चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव शंकरराव कदमांसमोर भाजपाकडून तिकीट घेतलेल्या विजयराव बोरावकेंचे मोठे आव्हान उभे होते. त्याचबरोबर अपक्ष म्हणून सुभाष शिंदेंनी दिलेली कडवी झुंजही दखल घेण्याजोगी ठरली. सुभाष कोळपे आणि कादरभाई दस्तगीर हेही अपक्ष म्हणून उभे होते. या निवडणुकीत चिमणरावांनी निम्म्यापेक्षा जास्त फरकाने विजयराव बोरावके यांचा पराभव करत सत्ता राखली.  वाई विधानसभा मतदारसंघात रंगतदार निवडणूक झाली होती. प्रस्थापित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  मदनराव पिसाळ यांना लक्ष्मणराव पाटील यांनी बंडखोरी करुन पराभूत करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे गजानन बाबर यांनीही चांगलीच मुसंडी मारली. तर कोंडीबा धोंडिबा शेलार यांचा अपवाद वगळता इतर अपक्षांना नगण्यच मते मिळाली. या निवडणुकीत मदनराव पिसाळ यांचा विजय झाला. कोरेगाव विधानसभा निवडणुकीत राजकारणाने नवे रंग भरले. डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या माहेरातून निवडणूक लढण्याचा  निर्णय घेतला. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या ताईंनी जनता दलाकडून उमेदवारी घेत प्रचंड अनुभवी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शंकरराव जगताप यांना चॅलेंज केले. मात्र, जगताप यांच्यापुढे ताईंचा टिकाव लागला नाही.  जगताप विजयी झाले. त्यांना 56 हजार 247 मते मिळाली. तर ताईंच्या मतांची दखल घेतली गेली. शालिनीताईंना 44 हजार 688 मते मिळाली होती. 

माण विधानसभा मतदारसंघावर जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोंडींचा मोठा परिणाम झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून विष्णुपंत सोनावणे, शिवसेनेकडून जगन्नाथ खाडे, बसपाकडून नंदा सावंत तर धोंडिराम सावंत अपक्ष म्हणून उभे  होते. निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार उभे असले तरी त्यामध्ये सोनावणे व सावंत यांच्यात जोरदार लढत होवून वाघमारे यांचा विजय झाला. वाघमारे यांना 58 हजार 55 मते मिळाली. त्यांनी पुढे पवारांना पाठिंबा दिला.     (क्रमश:)

शरद पवारांचे पाडापाडीचे राजकारण...

समाजवादी काँग्रेसचे राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे विलीनीकरण झाल्यानंतर शिवसेना व भाजपाने राज्यात हळूहळू बाळसे धरले. निवडणुकांच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात आयोजित केल्या जाणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचार सभांना अलोट गर्दी होत असे. परंतु, या गर्दीचे रुपांतर मतपेटीत कधीच झाले नव्हते. शरद पवार यांच्यावर जिल्ह्याचा विश्वास असल्याने युतीला याठिकाणी फारसे यश आले नाही. राजकीय खेळ्या अचूकपणे साकार करण्यात हातखंडा असलेल्या पवारांचे पाडापाडीचे राजकारणही जिल्ह्याने अनुभवले आहे. जाहीर सभा या आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जशा असतात तशा त्या त्याचपध्दतीने पाडण्यासाठीही असतात हे समीकरणही याच काळात रुढ झाले. अनाकलनीय, अतर्किक अशा पवार राजकारणाचा राजकीय ‘पॉवर प्ले’ जिल्ह्याने कित्येकदा पाहिला आणि अनुभवला आहे. त्याचे किस्से आजही चवीने सांगितले जातात.