Fri, Jun 05, 2020 12:34होमपेज › Satara › माण मतदारसंघात महायुती तुटली 

माण मतदारसंघात महायुती तुटली 

Published On: Oct 05 2019 12:33AM | Last Updated: Oct 04 2019 10:55PM
सातारा : प्रतिनिधी

कोकणातील कणकवलीमध्ये जशी महायुती तुटली आहे, तसाच पॅटर्न सातारा तालुक्यातील माण-खटावमध्ये निर्माण झाला असून भाजपने जयकुमार गोरे यांना ए, बी फॉर्म दिला आहे, तर शिवसेनेने शेखर गोरे यांना ए, बी फॉर्म दिला आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने माण, खटावमध्ये महायुती तुटली आहे आणि मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माण-खटावची विधानसभा निवडणूक कमालीची हाय व्होल्टेज होताना दिसत आहे.

काँग्रेसमध्ये असलेल्या जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या भरवशावर भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली किमया दाखवून रणजितसिंह ना. निंबाळकर यांना  निवडून आणण्यात वाटा उचलला. त्याच निवडणुकीत शेखर गोरे यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून शब्द घेतला.

मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही शब्द दिले.  मात्र, जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा शेखर गोरे यांना अंदाज आला. तत्पूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तुम्हाला तिकिट दिले नाही तर मी युती तोडेन, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेखर गोरे यांनी माध्यमांना सांगितले होते. महायुतीचे तिकिट वाटप नुकतेच जाहीर झाले. त्यात भाजपने ही जागा स्वत:कडे घेतली आणि भाजपच्या चिन्हावर जयकुमार गोरे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शेखर गोरे यांचे काय होणार? अशी चर्चा रंगली.

प्रत्यक्षात मात्र शेखर गोरे यांना शिवसेनेने ए, बी फॉर्म दिला. त्यामुळे माण-खटावमध्ये युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. असाच प्रकार कणकवली येथेही झाला असून तिथेही भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने आपल्या उमेदवाराला ए, बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे माण, खटावमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असेच स्पष्ट झाले आहे.