Wed, Feb 26, 2020 22:45होमपेज › Satara › राजघराण्याचे सातारकरांशी ऋणानुबंध 

राजघराण्याचे सातारकरांशी ऋणानुबंध 

Published On: Oct 04 2019 1:51AM | Last Updated: Oct 03 2019 11:29PM
सातारा : प्रतिनिधी

सातारकरांनी आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही. यावेळची निवडणूक वेगळी असून इतिहास घडणार आहे, असे प्रतिपादन  श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारकर व राजघराण्याचे ऋणानुबंध फार जुने आहेत. सातारकरांच्या  समस्या सोडवण्यासाठी, शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राजघराण्यातील प्रत्येक व्यक्‍तीने सक्षमतेने काम केले आहे.

सातारा  लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले व  सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी झाला. तत्पूर्वी दोघांनी गारेच्या गणपतीचे दर्शन  घेतले. यावेळी नागरिकांना संबोधित करताना उदयनराजे म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते व  मतदार उत्स्फूर्तपणे पाठीशी राहिले आहेत. या नागरिकांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. येत्या निवडणुकीत एक नवा इतिहास घडविणार आहे. शाहूनगरवासियांनी सर्व मतभेद व हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीसाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. सत्तेच्या माध्यमातून शहर व तालुक्याचा विकास करणार आहे. तुमचं भविष्य घडवण्यासाठी दोघांना साथ देणे गरजेचे आहे.

शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा शहराचा आणि आसपासच्या उपनगरांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हद्दवाढ प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. तसेच शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी 50 कोटी निधी मंजूर केला आहे.  सातारा शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकारच्या सहकार्याने विविध योजनांमधून भरीव निधी उपलब्ध  झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, विजय काटवटे, धनंजय जांभळे, अविनाश कदम, राजू भोसले, जयेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.