Sat, Jun 06, 2020 00:50होमपेज › Satara › किसन वीरांचाही झाला होता पराभव

किसन वीरांचाही झाला होता पराभव

Published On: Sep 26 2019 2:28AM | Last Updated: Sep 25 2019 11:51PM
सातारा : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही लागल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या यावेळच्या निवडणुका रंगतदार होत आहेत. तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्वीपासूनच चुरस होती. या निवडणुकांनी अनेक नेते महाराष्ट्राला मिळाले. त्यांचे राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान ठरले आहे. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या लढती आणि राजकीय परिस्थितीचा मागोवा घेणारी ‘विधानसभेच्या पाऊलखुणा’ ही वृत्तमालिका आजपासून...

स्वातंत्र्यानंतर 1952 साली झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीने जिल्ह्याचे राजकारणही ढवळून निघाले होते. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक अशा त्रिभाषिक मुंबई प्रांतांच्या या निवडणुकीचे पडसाद त्यावेळी सातारा जिल्ह्यात उमटले होते.  स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेबाबत जनता अजाण होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी खूप कमी होती. जिल्ह्यात  पूर्वी काँग्रेसने आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकरी, कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही आपले वर्चस्व कायम ठेवले होते. याच विधानसभा निवडणुकीने  मालोजीराजे निंबाळकर, यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर आबा, बाळासाहेब देसाई असे एकसे एक नेते दिले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकांमध्ये किसन वीर आबा तसेच आनंदराव चव्हाण या तगड्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. माण-खटावमधील दुष्काळ हा त्यावेळीपासून प्रचाराचा मुद्दा राहिला. 

मुंबई प्रांत त्रिभाषिक राज्यात 1952 साली झालेल्या  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने    पारतंत्र्यातील जनता स्वतंत्र होवून प्रथमच मतदार बनली. पाहिल्यांदाच लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडणुका होत असल्याने लोकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण होते. निवडणुकांशी पहिल्यांदाच सामना होत असल्याने लोक या प्रक्रियेपासून अनभिज्ञ होते. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या त्रिभाषिक असलेल्या पहिल्या विधानसभेच्या लढतीला अत्यंत कमी मतदान झाल्याच्या आठवणी सांगितल्या जातात. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची देशावर पकड असली तरी सातार्‍यात मात्र वेगळेच वातावरण होते. इथे शेतकरी कामगार पक्षाची ताकद होती. याच पक्षाने 1952 साली झालेल्या निवडणुकीनंतर  राज्याला मालोजीराजे नाईक निंबाळकर, यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई असे दिग्गज नेते दिले.

फलटण आणि माण तालुक्यातील प्रत्येक मतदाराला दोन आमदार निवडून आणण्याचा विशेष अधिकार होता. त्यावेळी फलटण खुला तर माण राखीव होता. फलटणचे नाईक निंबाळकर घराण्यातील मालोजीराजे यांचा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून मोठा विजय झाला. त्याचवेळी सातारचे गणपतराव तपासे यांनी माणच्या राखीव जागेवर काँग्रेसमधून लढलेली ही निवडणूक त्यांच्या पथ्यावर पडली.

पाटणच्या निवडणुकीत चुरस पहायला मिळाली होती. वकिली शिकलेल्या बाळासाहेब देसाईंना काँग्रेसने तिकीट दिले. त्यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण हे शेतकरी कामगार पक्षाकडून बाळासाहेबांच्या विरोधात उभे होते. कुंभारगावातील आनंदराव चव्हाणांना त्यांच्याच गावातील पी. एन्. काकांनी कडवा विरोध केला आणि  अत्यंत दुर्गम समजल्या जाणार्‍या पाटण मतदारसंघातून बाळासाहेबांचा निसटता विजय झाला. आनंदराव चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. 

सातारा विधानसभा मतदारसंघावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मोठी पकड होती. या मतदारसंघात लाल निशाण फडकत होते. क्रांतिसिह नाना पाटील यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते निकराचा लढा देत होते. सातार्‍यात काँग्रेसचे तिकीट आपल्यालाच मिळणार असे हाकीम मास्तर  मिरवत होते. मात्र, काँगे्रसने वयस्कर हकीम मास्तरांना डावलून रसूल इब्राहिम बागवान या तरुणाला तिकीट दिले. सातार्‍यात काँगे्रसने केलेला घाव त्यांच्याच वर्मी बसला आणि कम्युनिस्ट पक्षातून कॉ. विठ्ठल नानासाहेब तथा व्ही. एन्. पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. क्रांतिसिंह नाना पाटील, दत्ता देशमुख यांनी व्ही. एन्. पाटलांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे पाटलांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. 

कराड दक्षिण आणि कराड उत्तर या मतदारसंघातही निवडणूक  झाली. कराड उत्तर मतदारसंघावर पगडा असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने  केशवराव पवारांना उमेदवारी दिली. त्याचवेळी काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांना तिकीट दिले आणि ते आपल्या ताकदीवर निवडूनही आले. त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली. पुढे याच यशवंतरावांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

कराड दक्षिणची पहिली निवडणूक शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते यांनी लढवली. या ठिकाणी काँग्रेसने कॉ. संभाजीराव थोरात यांना उमेदवारी दिली होती.  तर डाव्या आघाडीच्यावतीने शेखकाका  निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत यशवंतराव मोहिते मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यांनी राजकारणातील हा दबदबा पुढेही कायम ठेवला.  जावलीसारख्या अतिदुर्गम भागात बाबासाहेब आखाडकरांचे नेतृत्व स्वातंत्र्यपूर्वीच निर्माण झालेले होते. त्यामुळे साहजिकच त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. आखाडकरांनी  त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मोरेंचा सहज पराभव केला. 

1952 पासून वाई आणि खंडाळा या दोन्ही तालुक्यांचा एकच मतदारसंघ होता. क्रांतिसिंह नाना पाटील  आणि किसन वीर यांच्यात पूर्वी सलोख्याचे संबंध असले तरी पक्षभिन्नता मात्र  होती.  या मतदारसंघातून किसन वीरांना काँग्रेसने तर शेतकरी कामगार पक्षाने दादासाहेब जगताप यांना तिकीट दिले. जगतापांचा जोरदार प्रचार  साहेबराव बाबर, विठ्ठलराव जगतापांनी केला. किसन वीरांना राजकीय वलय असले तरी या पहिल्याच निवडणुकीत किसन वीरांना पराभवाचा सामना करावा लागला.

खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँगे्रसने स्वातंत्र्यसैनिक गौरीहर सिंहासने  यांना उमेदवारी दिली. माण आणि खटावातील दुष्काळ त्यांनी प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला. यावरच त्यांनी ही निवडणूक जिंकली. 
(क्रमश:)