Wed, Apr 24, 2019 15:39होमपेज › Satara › सातार्‍यात भरतोय समस्यांचा भाजी ‘बाजार’

सातार्‍यात भरतोय समस्यांचा भाजी ‘बाजार’

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:28PM सातारा : सुशांत पाटील

शहरात बर्‍याच ठिकाणी मंडई रस्त्यावर आल्यामुळे  शहरात वाहतूक कोंडीचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे. आपल्या सोयीनुसार विक्रेते हवे तेथे स्टॉल थाटत असल्यामुळे  शहरातील  मुख्य भाजी मंडई ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे  सध्या समस्यांचा भाजी ‘बाजार’  शहरात भरत असल्याचे चित्र आहे. 

एसटी स्टँड परिसरात असलेली  भाजी मंडई तर भल्या पहाटे भरते. मात्र त्यानंतर या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे नागरिकाांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात भाजी विक्रेते आता रस्त्यातच ठाण मांडत असल्यामुळे  वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. 

सातार्‍यात छोट्या—मोठ्या मंडई व्यतिरिक्‍त छत्रपती शाहू मंडई, छत्रपती प्रतापसिंह भोसले मंडई व महात्मा फुले मंडई या प्रमुख मंडई आहेत. मात्र रस्त्यावरील मंडई  वाढत चालल्यामुळे  शहरातील प्रमुख असलेल्या मंडई ओस पडू लागल्या आहेत.

रविवार पेठेतील छत्रपती शाहू मंडईच्या उजव्या बाजूला फक्‍त छतासह बसण्याची थोडी फार सोय आहे.  त्यामुळे विक्रेत्यांना  नेहमी उन्ह—पावसाचा त्रास सहन करावा लागतो. ही मंडई नेहमी गजबजलेली असल्यामुळे काही विक्रेत्यांना मंडईच्या बाहेर बसावे लागते. बाहेरील बाजूला असलेल्या या मंडईतील भिंती धोकादायक असून त्या कधीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
बुधवार पेठेतील महात्मा फुले भाजी मंडई ही केवळ दोनच दिवस हाऊसफुल्‍ल असते. गुरुवार व रविवार सोडला तर या ठिकाणी ग्राहक व विक्रते थोड्याफार प्रमाणातच दिसून येतात. या भाजी मंडईत  सुविधेची वाणवा मोठ्या प्रमाणात दिसून येते. येथील पाण्यासाठी असलेल्या  नळाजवळ दुर्गंधी पसरली आहे. येथील भिंतीवरुन  सांडपाणीही उघड्यावर पडत आहे. त्यामुळे भिंतीनजीक सर्वत्र दलदल दिसून येते. त्यात काही विक्रेत्यांनी उरलेला भाजीपाला मंडईतच फेकला आहे. या मंडईत शौचालयाची असलेली सोय नावालाच असून तेथे असणार्‍या दुर्गंधीमुळे सहसा त्या शौचालयात परत जाण्याचे कोण धाडस करत नाही.  या मंडईत जनावरांचा वावरही वाढला असून त्यामुळे देखील मंडईत अस्वच्छतता पसरली आहे.

राजवाड्यातील मंडई अत्यंत ‘मॉडर्न मंडई’ म्हणून ओळखली जाते.  अलिकडे या मंडईत सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. येथे लाईटचीही सुविधा आहे. त्यामुळे टोपलीत ठेवलेल्या हिरव्यागार भाज्या ग्राहकांना मोहवतात. येथे विक्रेत्यांसह ग्राहकांचीही हाऊसफुल्‍ल गर्दी असते. त्यामुळेच कधी कधी काही विक्रेते बाहेरही बसतात. या मंडईत दोन मजले आहेत. मात्र या मंडईचा वरचा मजला कायमच बंद असतो. तेथे सर्वत्र कचरा व धूळच दिसून येते. क्षमता असताना देखील मंडईतील काही विक्रेत्यांना बाहेरच बसावे लागते. याबाबत धूळ खात पडलेल्या दुसर्‍या मजल्यावरही भाजी मंडई सुरु करुन विक्रेत्यांना योग्य अशा सोयी सुविधा देण्याची मागणी विक्रेत्यातून व नागरिकातून होत आहे.