Mon, Jul 15, 2019 23:53होमपेज › Satara › सरकारच्या निषेधार्थ उपराकारांचे मुंडण

सरकारच्या निषेधार्थ उपराकारांचे मुंडण

Published On: Dec 24 2017 6:44PM | Last Updated: Dec 24 2017 6:44PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाची प्रशासन पातळीवर कोणतीही दखल न घेतल्याने उपराकार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी मुंडण करून शासनाचा निषेध केला.

गेल्या दोन दिवसांपासून शासकीय नोकरभरती तात्काळ सुरू करा. सरकारी नोकरांच्या पेन्शन 2005 पासून सर्वांना सुरू करा. भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करा. कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने भरती बंद करा. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खाजगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना, सेवा उद्योगांना लागू करा.

खाजगी सेवा उद्योगातील कर्मचार्‍यांना  कायद्याने संरक्षण द्या, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग या सर्वांचा बॅकलॉग तत्काळ भरा, सहकारी संस्थांचे  खाजगीकरण  थांबवा तेथे तत्काळ नोकर भरती सुरू करा, या मागण्यांसाठी चक्री उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाने दोन दिवसांत कोणतीही दखल न घेतल्याने रविवारी सायंकाळी लक्ष्मण माने व ओबीसी संघटनेचे नेताजी गुरव यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.