Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Satara › विजयी सदस्यांचा नेता कोण?

विजयी सदस्यांचा नेता कोण?

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:53AMउंडाळे : वैभव पाटील 

कराड दक्षिण मतदारसंघातील  ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर दक्षिणेत कोणत्या गावात कोण्या नेत्याची सत्ता, याबाबत मतदार संघात संभ्रमास्था निर्माण झाली असून निवडून आलेले सदस्य नेमके कोणाचे, याबाबत वेगवेगळ्या मतांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. 

कराड दक्षिण मतदार संघात रेठरे बु., येणपे, येवती, शेळकेवाडी ग्रामपंचातींच्या निवडणुका झाल्या. रेठरे बु. येथे युवा नेते डॉ.अतुल भोसले गटाने एकहाती सत्ता घेतली. पण येवती व येणपे या दोन गावात सत्ता कोणाची याबाबत संभ्रम आहे. येवती येथे डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी सागर शेवाळे यांची निवड झाली. खुद्द शेवाळे यांनी आपण डॉ. भोसले यांचे नेतृत्व मानतो असे सांगितले. त्यामुळे शेवाळे हे उंडाळकर गटाचे, हा दावा फोल ठरला. तरीही शेवाळे यांना पडद्यामागे कोणाची मदत झाली याबाबत गावात वेगळीच चर्चा सुरू आहे. येवती येथे सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर सरपंच व दोन सदस्य पदांसाठी मतदान झाले. यात  डॉ.भोसले गटाने बाजी मारली.  
येणपे निवडणुकीबाबत उलट -सुलट चर्चा असून अ‍ॅड. उदयसिंह पाटील युवा आघाडी  विरूध्द माजी सभापती किसन जाधव त्यांचे बंधू सेवानिवृत्त पोलिस अधिकारी नानासाहेब जाधव,  पै. सचिन बागट यांनी स्थापन केलेली रयत सहकार आघाडी अशी युवा व ज्येष्ठांची आघाडी समोरा समोर होती. 

दोन्ही गटांनी उंडाळकरांचे नेतृत्व सांगितले. तर उंडाळकर यांनी युवा आघाडीतून सरपंच पदाचा उमेदवार दिल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.  सरपंच पदासाठी तिरंगी लढत होऊन ज्येष्ठांच्या आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार दादासाहेब जगताप  विजयी झाले. अन्य ठिकाणी 11 पैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या. उर्वरीत जागा दोन गटात विभागल्या.6 जागा आपल्या गटाकडे असल्याचा दावा युवा आघाडीने केला  आहे.

यापैकी काही सदस्य उंडाळकरांचे नेतृत्व न मानणारे आहेत. यामध्ये साहेबराव कांबळे, सौ. पूनम जाधव याचा समावेश आहे. सौ जाधव या डॉ. अतुल भोसले यांना भेटून आल्या आहेत.  ज्येष्ठांची आघाडी ही गत सोसायटी  निवडणुकी पासून अंतर्गत गटबाजीने पोखरली आहे. त्यामुळे हा गट अप्रत्यक्षपणे उंडाळकर यांचेवर नाराज आहे. तर उमेदवार देऊनही उंडाळकर यांनी आपल्याला मदत केली नाही त्यामुळेच  आपला गट पराभूत झाला, याचे खापर युवा आघाडीने उंडाळकर यांचेवर  फोडले आहे.  दरम्यान काही विजयी सदस्य माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले यांना भेटल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयाचे श्रेय नेमके कोणाला याचीही चर्चा विभागात रंगली आहे. दोन्ही गावात मानापमानाचे नाट्य सुरू असून उपसरपंचपद पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न होतील. 

निवडणुकीपूर्वी आणि नंतर..
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांनी आम्ही तुमचेच आहोत, आम्हाला पाठिंबा द्या,अशी विनवणी केली. निवडणुकीनंतर मात्र पाठिंबा देेणार्‍यांनाचा बाजूला ठेवून अन्य नेत्यांच्या आश्रयाला गेले. ही परिस्थिती कराड दक्षिणमध्ये घडली आहे.