Tue, Jul 23, 2019 11:20होमपेज › Satara › बहिणींनी खाल्‍ली विषारी पावडर

बहिणींनी खाल्‍ली विषारी पावडर

Published On: Jul 19 2018 8:00PM | Last Updated: Jul 19 2018 8:00PMसातारा : प्रतिनिधी

खेळत असताना घरात असणारी उवा मारण्याची पावडर खाल्ल्याने अवघ्या अडीच वर्षाच्या आरती अविनाश सपकाळ (अंदोरी, ता. खंडाळा) या चिमुरडीचा मृत्यू झाला असून तिची 4 वर्षाची अनुष्का ही बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, या घटनेमुळे सपकाळ कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेने हळहळ व्यक्‍त आहे.

अंदोरी (ता. खंडाळा) येथे आरती व अनुष्का या बहिणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात खेळत होत्या. खेळता खेळता चुकून दोघींना उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी पावडरची पुडी सापडली. या पुडीतील पावडर दोघींनीही खाल्ली. थोड्या वेळाने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. दोघीही अचानक उलट्या करु लागल्याने कुटुंबिय घाबरुन गेले. या मुलींकडे चौकशी केली असता अनुष्काने खेळताना सापडलेल्या पुडीमधील पावडर खाल्ल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तत्काळ या दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच आरतीची प्रकृती अत्यवस्थ बनली. यामुळे सपकाळ कुटुंबियांनी दोघींनाही उपचारासाठी सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना  आरतीचा मृत्यू झाला.

या घटनेने सिव्हील रुग्णालयही हेलावून गेले. दरम्यान, अनुष्काची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.