सातारा : प्रतिनिधी
यंदा प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीमध्ये सावळा गोंधळ उडाला आहे. यामुळे अनेक शिक्षकांना मूळच्या शाळेवरून विस्थापित व्हावे लागले आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेतील दोष दुरूस्त करून नव्याने बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, याबाबत न्याय न मिळालयास प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा विस्थापित शिक्षकांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.27 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार यावर्षी बदल्या केलेल्या नाहीत. प्रथम जिल्हा सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्या नाहीत. शासन आदेशात नमूद केल्याप्रमाणे एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त शाळा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे शाळा भरताना सर्वच संवर्गातील शिक्षकांचा गोंधळ झाला आहे. प्रत्येक टप्प्याची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या टप्प्यात बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. सातारा जिल्ह्यात बदलीचे आदेश देऊन शिक्षक बदली शाळेवर हजर झाले. तरीही अद्याप बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी व विस्थापित शिक्षकांची यादी प्रसिद्ध केलेली नाही.
31 मे 2017 च्या शुध्दीपत्रकातील मुद्दा क्रमांक 3 नुसार यापूर्वी दुर्गम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांनी विनंती बदलीची मागणी केली तरच त्याला संधी द्यावी, असे असतानाही प्रशासकीय बदलीत अशा शिक्षकांना प्रथम संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक विस्थापित झाले आहेत. आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात हजर झालेल्या शिक्षकांनी यावर्षीच्या जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये फॉर्म भरू नयेत, असे राज्य समन्वयक प्रदीप भोसले यांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पोस्ट क्र.1161, 1162, 1165 नुसार कळवले असतानाही आंतरजिल्हा बदलीने गेल्यावर्षी हजर झालेल्या शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीचा लाभ घेतल्याने मूळ तालुक्यातील शिक्षक विस्थापित झालेले आहेत.
18 एप्रिल 2018 च्या शासन परिपत्रकात संवर्ग 1 व 2 मध्ये भरलेल्या फॉर्ममध्ये शिक्षकांच्या आजारपणाची, आजारपणाच्या प्रमाणपत्रांची व दोघांमधील अंतराची, जोडीदाराच्या नोकरीची तपासणी करण्यास कळवले असतानाही जि.प. स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.पती पत्नींना एकाचवेळी नेमणूक देऊन 30 किमीमध्येच नेमणूक देण्यात येईल, असे आदेशात नमूद असतानाही 30 किमी अंतरामध्ये नेमणुका दिलेल्या नाहीत. अनेक शाळेत बदलीपात्र शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षकांना आदेेश देण्यात आले. अशा प्रकारे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शाळांमध्ये बदली पात्र संख्येपेक्षा हजर शिक्षकांची संख्या जास्त आहे. यावेळी दीपक भुजबळ, स्वाती चव्हाण, मंदाकिनी फरांदे, सारिका गुरव, अनिल चव्हाण, मच्छिंद्र ढमाळ, राजेश बोराटे, भानुदास जाधव, संतोष कदम, दत्ता साळुंखे व शिक्षक उपस्थित होते.