Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Satara › झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ

झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:46PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी  

शहरातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या ओढण्यास  पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘शहरातून झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या  गायब’ या वृत्ताची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने उपाययोजनांना  प्रारंभ केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोवई नाक्यावर झेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्या गायब झाल्या होत्या.  त्यामुळे वाहनधारकांना झेब्रा क्रॉसिंगच दिसत नव्हते.  सिग्नलच्या ठिकाणीही  झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढर्‍या पट्ट्या  दिसत नव्हत्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत होती. अनेक वाहनधारकांना पट्ट्याच दिसत नसल्यामुळे दंडालाही सामोरे जावे लागत होते. दै.‘पुढारी’ने याबाबत वृत्त दिले तसेच  वाहतूक पोलिस शाखेने देखील याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली होती. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने पोवई नाक्यावरुन राजवाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच पोवई नाक्यावरुन शाहू चौकाव्दारे राजवाड्याकडे जाणार्‍या  रस्त्यावर पांढर्‍या पट्ट्या आखण्याचे काम सुरु आहे. पोवई नाक्यावर सर्वत्र झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या आखण्यात आल्या.त्यामुळे वाहनधारक सिग्नल लागताच झेब्रा क्रॉसिंगवर थांबू लागले. नागरिक येता जाता नाक्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा वापर करु लागल्याचे आता दिसू लागले आहे. 

शहरात पांढर्‍या पट्ट्या व झेब्रा क्रॉसिंग आखण्यास सुरुवात केली असल्यामुळे वाहनधारकांबरोबर वाहतूक पोलिसांचा त्रास कमी झाला आहे तसेच वाहनधारकांची होणारी फसगतही आता थांबणार असल्यामुळे पालिका प्रशासनाच्या या मोहिमेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.