Tue, Jul 16, 2019 09:56होमपेज › Satara › मुजोर क्रेनचालकांना आवरा

मुजोर क्रेनचालकांना आवरा

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 11 2018 12:58AMसातारा : प्रतिनिधी

सातारा वाहतूक विभागाच्या क्रेनवरील कर्मचार्‍यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यांचे तीन तेरा वाजले असतानाच केवळ दंड मिळवण्यासाठी क्रेनचालकाकडूनच वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत सातारकरांमध्ये तीव्र संतापाची लाट असून शहर व शाहूपुरीच्या पोलिस अधिकार्‍यांनी वेळीच क्रेनवरील कर्मचार्‍यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रेड सेप्रेरेटच्या कामामुळे सातारा शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला आहे. पोवई नाक्याच्या  चारही बाजूने जाणार्‍या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी वाहतूक पोलिस जीवाचे रान करत आहेत. एकीकडे असे दृश्य असताना दुर्देवाने क्रेनवरील कर्मचार्‍यांकडून याला हरताळ फासला जात आहे. सातारा वाहतूक व शाहूपुरी पोलिस ठाण्याची वाहतूकची क्रेन आहे. नो पार्कींगमध्ये असणारी वाहने या क्रेनद्वारे वाहतूक विभागात आणली जातात. वाहतुकीस अडथळा होवू नये, हा वाहतूक पोलिस व क्रेन चालकांचा उद्देश असायला हवा. दुर्देवाने क्रेन चालक व त्यावरील कर्मचार्‍यांकडून ही बाब फाट्यावर मारली जात आहे. एखादे वाहन नो पार्कींगमध्ये असेल तर क्रेन चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेवून मग त्यावरील कर्मचार्‍यांनी जावून नो पार्कींगमधील गाडी आणली पाहिजे. सातार्‍यात मात्र क्रेन चालकाकडून क्रेनची गाडी रस्त्यातच लावली जात आहे. यामुळे पाठीमागून येणार्‍या सर्वच गाड्यांना थांबण्याशिवाय पर्याय राहत नाही.

सातार्‍यातील ज्येष्ठ व सुज्ञ नागरिकांनी क्रेन चालकाला गाडी मोकळ्या बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर अरेरावी केली जात आहे. एवढ्यावरच क्रेन चालक व त्यावरील कर्मचारी थांबत नसून शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार करत आहे. यामुळे समस्त सातारकरांच्या मनामध्ये संतापाची लाट आहे. वाहतुकीला अडथळा होवू नये यासाठी सौजान्याने सांगितल्यानंतरही क्रेन चालक व त्यावरील कर्मचार्‍यांकडून मुजोरीची भाषा होत आहे. त्याला आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.