Tue, Jul 23, 2019 01:43होमपेज › Satara › सिव्हिलच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले

सिव्हिलच्या लिफ्टमध्ये तिघे अडकले

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 10:48PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लिफ्ट रविवारी दुपारी  अचानक बंद पडल्याने लहान मुलांसह तिघेजण तब्बल दोन तास अडकून पडले. सिव्हिल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, अखेर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन लिफ्टचे दार तोडून अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी, सुवर्णा इंगवले (रा.तासगाव जि. सांगली) या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दोन मुलांसमवेत आल्या होत्या.  दुपारी लिफ्टमधून जात असताना अचानक ही लिफ्ट बंद पडली. या घटनेने त्या घाबरल्या. लिफ्टमध्ये त्या लहान दोन्ही मुलांसोबत असल्याने मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लिफ्टमधून आवाज येत असल्याने त्याठिकाणी इतर रुग्णांसह नातेवाईक घटनास्थळी जमले.

लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. आतून मात्र ती माय दोन्ही मुलांसह बचावासाठी आरडाओरडा करत होती. सुमारे एक तास हा गोंधळ सुरु असताना लिफ्टचा टेक्निेशियन व सिव्हीलचे कोणीही तिकडे फिरकले नाही. याच दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केल्यानंतर अखेर लिफ्टचे दार तोडून आत अडकलेल्या तिघांना बाहेर काढले.
लिफ्टमधील महिलेसह दोन्ही मुले बाहेर आल्यानंतर त्यांना हायसे वाटले. लिफ्टबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. मात्र सिव्हील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब एखाद्या जीवावर उठण्याची शक्यता असल्याने तत्काळ लिफ्टची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सिव्हील प्रशासन मात्र याबाबत वेळकाढूची भूमिका घेत असल्याने त्याबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.