Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Satara › अवैध गर्भपात औषधविक्री, तिघांना अटक

अवैध गर्भपात औषधविक्री, तिघांना अटक

Published On: May 08 2018 3:59PM | Last Updated: May 08 2018 4:07PMसातारा : प्रतिनिधी

हिरापूर ता. सातारा येथे सापडलेल्या बेकायदा गर्भपात किटप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने उर्वरीत तिन्ही संशयितांना अखेर अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्‍यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी पाचजणांना अटक झाली असून त्या पुढे तपास सरकलेला नाही.

अजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे रा.हिरापूर), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील हिरापूर येथे गर्भपात औषधाचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांच्या सहकार्याने दीड महिन्यापूर्वी छापा टाकण्यात आला. या छाप्यात एमटीपी किटच्या गोळ्या सापडल्यानंतर सातार्‍यात खळबळ उडाली होती. दुर्देवाने मात्र कारवाई कशी करायची, कलमे कोणती लावायची हेच तालुका पोलिसांना समजले नाही व त्या गोंधळात पकडलेले चारही संशयित आरोपी पळून गेले. या घटनेचे समाजमनात तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.

एलसीबीकडे तपास आल्यानंतर या विभागाने कलमे वाढवून लगेचच प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख याला व नंतर विलास देशमुख या दोघांना अटक करून  खळबळ उडवून दिली. एलसीबीचा तपास सुरू असताना उर्वरीत संशयित मात्र पसार झाल्याने ते आढळून येत नव्हते. तपासादरम्यान, सापडलेली औषधेच बनावट असल्याचा अहवाल आल्याने एलसीबी विभागाने दुसर्‍या टप्प्यात पुन्हा कलमे वाढवली. दुसरीकडे अन्न व औषध विभागानेही कारवाईचा फास आवळून सातार्‍यातील मेडीकलचे परवाने निलंबीत केले. या सर्व घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

गर्भपात औषधांचा साठा सापडल्याने व त्यातील आणखी तीन संशयित आरोपी सापडत नसल्याने एलसीबीसमोर आव्हान निर्माण झाले होते. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्‍हाड, पोलिस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, विक्रम पवार हे तपास करत असताना मंगळवारी उर्वरीत तिन्ही संशयितांची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तयार करून छापा टाकला असता,तिघांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांना अटक करुन न्यायालात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.