होमपेज › Satara › हजारो वृक्षांची कत्तल

हजारो वृक्षांची कत्तल

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:53PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा-कोरेगाव-म्हसवड-टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 च्या चौपदरीकरण कामासाठी सातारा तालुक्यातील सुमारे 400 वेगवेगळ्या जातीच्या झाडांची कत्तल सुरू झाली आहे. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. हैद्राबाद हे महामार्ग रुंदीकरणाचे काम करत असून, जिल्ह्यातील जुने असलेले हजारो वृक्ष तोडले गेल्याने वृक्षप्रेमींतून संतापाची लाट उसळली आहे.

सातारा-कोरेगाव-म्हसवड  (रा. मा. क्र. 141) तसेच म्हसवड-टेंभुर्णी (रा.मा.क्र. 145) या राज्यमार्गांचे राष्ट्रीय महामार्गांत (क्र. 548)  रूपांतर झाले आहे. या महामार्ग रुंदीकरणाची नुकतीच वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 225 कोटींचे हे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. एका टप्प्यातील काम गडोख या ठेकेदाराला देण्यात आले असल्याचे समजते. या कामासाठी माण तालुक्यात एका ठेकेदाराने वार्षिक 15 लाख भाडेपट्ट्याने 65 एकर माळरानावर हॉटमिक्स, वाहने, साहित्य आदीसाठी घेतल्याची चर्चा आहे. महामार्गाच्या कामासाठी ठेकेदारांना अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. संबंधित ठेकेदार बरेच साहित्य भाड्याने घेणार असल्याने ते या कामाच्या टेंडरसाठी पात्र आहेत का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून या टेंडरप्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणीही होवू लागली आहे.

एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या नियोजित महामार्ग रुंदीकरणासाठी सल्लागार म्हणून मे. एल. अँड टी. इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग लि. असोसिएशन विथ फोर्टेस इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅडव्हाझरी सर्व्हिस (टीम बी) या ठेकेदार कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी या कंपनीला 3 कोटी 43 लाख 68 हजार देण्यात येणार आहेत. या कंपनीने महामार्गाच्या कामासंदर्भात आवश्यक त्याची पूर्तता करायची आहे. त्यामध्ये वृक्षतोड व त्याची वाहतूक व अन्य कामे करण्याचेही नमूद केले आहे. या कंपनीने पुन्हा हैद्राबाद येथील ठेकेदार असलेल्या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीला वृक्षतोडीचे काम दिले आहे.  नियोजित महामार्गाची पाहणी केली असता संबंधित कंपनीने वड, काशिद, उंबर, पिंपळ, बाभूळ, गुलमोहर, आंबा, करंज, लिंब, पिंपरण, बदाम, शेवगा, वाळवी, आकेशिया, जांभूळ आदि झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. एकाच तालुक्यातील चारशेहून अधिक झाडे तोडण्यात येणार असल्याने रुंदीकरण करण्यात येणार्‍या महामार्गावरील सुमारे 188 कि.मी. दरम्यान असलेल्या हजारो झाडांवर कुर्‍हाडी कोसळत आहेत.  जिल्ह्याचा बहुतांश भाग वृक्षराजीने नटला आहे. मात्र, रस्ते विकासाच्या नावाखाली या  शेकडो वर्षांच्या जुन्या असलेल्या महाकाय वृक्षांवर कुर्‍हाडी चालवल्या जात आहेत. प्रशासकीय सोपस्कार पार पाडले की संबंधित ठेकेदार झाडे तोडायला मोकळे होतात. मात्र, त्यानंतरच्या जबाबदारीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करा

जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरणात  हजारो झाडे तोडण्यात आली. संबंधित ठेकेदाराने तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावणे बंधनकारक आहे. असे असतानाही या महामार्गालगत संबंधित ठेकेदारांनी एकही लावलेले झाड दिसत नाही. सरकार दरवर्षी शतकोटी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आखते, साजरा करते. मात्र, जिल्ह्यात प्रशासनाच्या मदतीने प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने वनसंपदा संपवली जात आहे. हमी देवूनही महामार्गालगत झाडे न लावणार्‍या  संबंधित ठेकेदारांवर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करणार का? असा सवाल निसर्गप्रेमींतून होत आहे.

माण तालुक्यात शेतकर्‍यांतून उठाव

नियोजित महामार्ग कामासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया संबंधित प्रांताधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. भूसंपादनासाठी संबंधित शेतकरी, नागरिकांना मोजणीच्या नोटीसा देण्यात येणार आहेत. मात्र, ही कायदेशीर प्रक्रिया पार न पडताच संबंधित ठेकेदार कंपनीकडून रेटून कामे करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. महामार्गाच्या कामाविरोधात  माण तालुक्यातील शेतकर्‍यांनी उठाव केला आहे. सुमारे 70 शेतकर्‍यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून ठेकेदारांच्या मग्रुरीला आवर घालावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात विकासात आडकाठी नको म्हणून अनेक शेतकर्‍यांनी स्वत:ला  खार लावून घेतला. एकेकावर भूमिहीन व्हायची वेळ आली. मात्र, संबंधित लगतच्या गावांना विश्‍वासात घेतले जात नाही. गावकर्‍यांच्या मागण्या व समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.