Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Satara › पहिल्या हळेकन्नड शिलालेखाचा सातार्‍यात शोध

पहिल्या हळेकन्नड शिलालेखाचा सातार्‍यात शोध

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:21PM
सातारा : प्रतिनिधी

वराडे (ता. कराड) येथे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहसावर प्रकाश टाकणारा सन 1091 मधील  पहिला शिलालेख सापडला. म्हसवडमधील सिध्दनाथ मंदिरात असलेल्या हळेकन्नड शिलालेखापेक्षा हा शिलालेख जुना आहे. वीस ओळींमध्ये असलेल्या या शिलालेखावरुन चाळीस हजार गावांचा राजकीय प्रांत असलेले कराड प्रमुख ठिकाण असल्याचे स्पष्ट होते. या शिलालेखामुळे चालुक्य आणि कलचुरींच्या भागावरील सत्तेचा उलगडा होणार असल्याची माहिती कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर तसेच इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. गौतम काटकर म्हणाले, वराडे गावच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या घटनेश्‍वर मंदिरालगत 972 वर्षांपूर्वीचा हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत होता.  कल्याणीच्या चालुक्य राजाचे मांडलिक असणार्‍या महामंडलेश्‍वर जोगम कलचुरी यांच्या कारकिर्दीतील अधिकारी सगरैय्या याने वराडे येथील एका शिवमंदिराला नैवेद्य नंदादीपासाठी दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. त्यावर ‘सवत्स धेनू’चे शिल्प, शिवलिंग व सूर्यचंद्र कोरले आहे. या शिल्पावरील लेख हळेकन्नड (प्राचीन कन्नड) लिपीत आहे. लेखावर 20 ओळी आहेत. त्यातील काही भाग पुसट असला तरी त्याचे वाचन करता येते. या लेखावर कलचुरी घराण्यातील महामंडलेश्‍वर जोगम याचा उल्लेख आला आहे. शके 1013 प्रजापती नाम सवंत्सरी म्हणजे इ. स. 1091 मध्ये हा दानलेख लिहून ठेवण्यात आला. जोगम कलचुरी याचा अधिकारी सगरैया याने वराडे परिसरातील एका शिवमंदिराला नैवेद्य नंदादीपासाठी दान दिल्याचा उल्लेख यात आहे. लेखात जोगम याचा उल्लेख चालुक्याचा मंडलिक असा न करता महामंडलेकश्‍वर असा केला आहे. यावरुन जोगम कलचुरी हा बराच प्रबळ झाला असून कराड आणि परिसरात स्वतंत्र राज्य करत असल्याचे अनुमान करता येते. जोगम कलचुरी हा कलचुरी घराण्यातील पहिला ज्ञानी पुरुष होता. याच्या कारकीर्दीतील अन्य लेख चडचण (जि. विजापूर), तीर्थ व अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे सापडले आहेत. वराडे येथे सापडलेला चौथा लेख आहे. या शिलालेखामुळे कराड व परिसरावर चालुक्य व कलचुरींची सत्ता होती यावर शिक्कामोर्तब झाले. 

कालखंडानुसार  हळेकन्नड  (प्राचीन कन्नड) भाषेत असणारा हा पहिला हळेकन्नड  शिलालेख ठरला आहे. मानसिंगराव कुमठेकर म्हणाले, कराड तसेच सातारामध्ये हळेकन्नड सापडू शकतात, असे एम. एम.कलबुर्गी यांनी त्यांच्या ‘महाराष्ट्रातील शिलालेख’ या पुस्तकात म्हटले आहे.  वराडे येथील शिलालेखाचे जतन व्हावे. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, प्रा. गौतम काटकर यांनी हळेकन्नड शिलालेखाचे अतिशय चिकाटीने संशोधन केले. नव्या शिलालेखाचा शोध लागल्याने महाविद्यालयाला गौरव प्राप्त झाला  आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. यावेळी प्रा. जमीन मोमीन, प्रा. डॉ. दिलीप गायकवाड आदि उपस्थित होते.