Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Satara › सैनिक स्कूलमध्ये सिंथेटिक बास्केटबॉल मैदान

सैनिक स्कूलमध्ये सिंथेटिक बास्केटबॉल मैदान

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:23PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

ज्या शाळेने शिकवले, घडवले, ज्ञानवंत केले, प्रगतीचा पाया रचला त्या शाळेप्रती येथील दीपक वसंतराव पाटील  यांनी जपलेले ऋणानुबंध कौतुकाचा विषय ठरले आहे. वडिलांनंतर स्वत:च्याही शिक्षणाचा पाया भक्‍कम करणार्‍या सैनिक स्कूलमध्ये  आपल्या पित्याच्या स्मरणार्थ अद्ययावत  असे बास्केटबॉल मैदान पे्रक्षा गॅलरीसह उभारुन  त्यांनी अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. या सिंथेटिक बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ उद्या शनिवार दि. 13 जानेवारी रोजी सायं. 4.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. 

शाळेप्रती असणार्‍या ऋणानुबंधाची वीण कोणी कशी घट्ट करेल हे सांगता येत नाही. दीपक पाटील यांनी मात्र सैनिक स्कूलच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे वडील स्व. वसंतराव पाटील यांचे  1961 ते 1967 या कालावधीत सैनिक स्कूल येथे शिक्षण झाले.  ज्या शाळेत वडिलांचे शिक्षण झाले. त्याच सैनिक स्कूलमध्ये तेही शिकले अन् जीवनात उत्तुंग यश मिळवले. आपल्या शाळेचे ऋण किंचित तरी फेडावे, या उद्देशाने त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ सैनिक स्कूल येथे स्वखर्चाने अद्ययावत असे सिथेंटिक बास्केटबॉल मैदान विकसित केले. सुमारे 25 लाख रुपये निरपेक्ष भावनेतून खर्च करुन केलेल्या या मैदानाभोवती प्रेक्षा गॅलरी, एक व्हिआयपी प्रेक्षा गॅलरी, एक मोठे व्यासपीठ, विद्युत यंत्रणा, क्रीडा साहित्यांसाठी खोली बांधण्यात आली आहे. सैनिक स्कूलच्या लोकल बॉडीने परवानगी दिल्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यात रात्रीचा दिवस करुन हे मैदान विकसित करण्यात आलेले आहे. 

दीपक पाटील यांच्या कुटुंबीयांचे सैनिक स्कूलशी भावनिक नातेच जडले आहे. वडील स्व. वसंतराव पाटील यांची शालेय जीवनातच क्रीडा क्षेत्राशी नाळ जुळली. 110 मीटर हर्डल्स, तिहेरी उडी, फुटबॉल, बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात ते निष्णात होते. महाविद्यालयीन काळातील राष्ट्रीय स्पर्धांत 110 मीटर हर्डल्समध्ये त्यांनी विक्रम नोंदवले. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ते सातारकरांच्या सेवेत रुजू झाले. व्यवसाय करताना त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष, सैनिक स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष, सातारा जिमखान्याचे सदस्य, सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची दहा वर्षे त्यांनी धुरा सांभाळली. 1988 कालावधीत ज्येष्ठ क्रीडा संघटक रमेश शानभाग, अरविंद गवळी, स्व. प्रदीप भोसले यांच्या साथीने त्यांनी दिल्लीतील क्रीडा ज्योतीचे उत्तम संयोजन केले.  स्व. पाटील यांना सैनिक स्कूलबद्दल मोठा अभिमान होता. यामुळेच त्यांनी चिरंजीव दीपक यांनादेखील सैनिक स्कूलमध्ये दाखल केले. शिक्षणाबरोबरच सातार्‍यातील मुलांनी क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करावा, यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. त्यांची कन्या कावेरी हिने राष्ट्रीय स्तरावर तर दीपक यांनी विद्यापीठस्तरावर बास्केटबॉल खेळात आपली छाप उमटवली आहे. वडिलांच्या निधनानंतर दीपक हे व्यवसायाबरोबक्षरच समाजातील उपेक्षितांसह गुणवंतांच्या पाठीशी उभे राहू लागले. त्यांचा सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील वारसा ते जोपासत असल्याचे पाहून त्यांच्या भगिनी सौ. उर्मिला अभिजीत पाटील, सौ. ऐश्‍वर्या अमित ठाकरे  व मातोश्री जयश्री वसंतराव पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. वृक्षारोपण, खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करणे याबरोबरच क्रीडा संस्था, संघटना यासारखी मोलाची मदत पाटील कुटुंबीयांकडून अव्यहातपणे सुरु आहे.