होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर साजरा होणार उद्या सातारा स्वाभिमान दिवस

अजिंक्यतार्‍यावर साजरा होणार उद्या सातारा स्वाभिमान दिवस

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:48PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची जिवंत आणि ज्वलंत राजधानी म्हणून सातार्‍याचा देशभर लौकिक आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व छ. संभाजीराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर त्यांचा अजिंक्यतार्‍यावर राज्याभिषेक झाला. या विलक्षण घटनेला 310 वर्ष पूर्ण होत असून सातारा शहराच्या संस्थापकांचा स्मरणदिन व सातारा स्वाभिमान दिवस शुक्रवार दि. 12 जानेवारी रोजी अजिंक्यतार्‍यावरील राजसदर येथे साजरा केला जात असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने सुदामदादा गायकवाड यांनी दिली.  

दरम्यान, शुक्रवार दि 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्यतार्‍याच्या राजसदरेवर सकाळी 7 वाजता ज्येष्ठ इतिहास तज्ञ व शिवव्याख्याते पांडुरंग बलकवडे व डॉ. संदिप महिंद गुरूजी यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती व सातारा स्वाभिमान दिनानिमित्त आयोजित उपक्रमाला नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, सातारा हिल मॅरेथॉनचे अध्यक्ष डॉ. संदीप काटे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष अमर जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

प्रत्येक देशवासियाला भारतीय स्वतंत्रदिनाचे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला महाराष्ट्र दिनाचे महत्व आहे. तसाच 12 जानेवारी हा दिवस प्रत्येक सातारकराला वंदनीय आहे. छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक, मंचकारोहण झाल्याचा हाच तो दिवस. काहीसा विस्मृतीस गेलेला आहे. वास्तविक 23 मे 1698 ला सातारा किल्ल्यावर गादीची स्थापना केली. तरी छत्रपती शाहू महाराजांवर राज्याभिषेक झाला तो 12 जानेवारी 1708 रोजी.  विधीवत राज्याभिषेक झाल्यानंतरच सातार्‍याला खर्‍या अर्थाने राजधानीचा मान मिळाला. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ही तिसरी राजधानी अखंड हिंदुस्थानात डौलाने फडकू लागली. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्यतार्‍यावर हजारो हात जीर्णोद्धारासाठी झटत आहेत. अशा जीर्णोद्धारासाठी झटणार्‍या सातारकरांचे समस्त शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे सचिव महेश पाटील व उपाध्यक्ष शेखर तोडकर, शरद पवार, प्रवीण धुमाळ, अमोल खोपडे, कृष्णा भुजबळ, अविनाश कापले, रितेश मोरे, आकाश गायकवाड यांनी केले आहे.