Sun, May 26, 2019 19:08होमपेज › Satara › सुकाणू समितीचे राज्यभर अन्नत्याग आंदोलन 

सुकाणू समितीचे राज्यभर अन्नत्याग आंदोलन 

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

राज्यातील आजपर्यंत 75 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या सरकारला शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे काही देणं घेणं नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर  दि. 19 मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीच्यावतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील  यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, शासनाने कोणालाही कर्जमाफी व कर्जमुक्ती दिली नाही. तर उलट पैसे भरून मुख्यमंत्र्यांनी वसुलीची मोहिम सुरू केली आहे. पहिले कर्ज माफ झाले तरी शेतकर्‍यांना आज एकही बँक कर्ज देत नाही. बँकांकडून कर्ज निलचे दाखले दिले जात नाहीत. गेली  9 महिने शेतीचे कर्ज बंद करण्यात आले आहे.  त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. शासनाने शेतकर्‍यांना कर्ज निलचे दाखले द्यावेत व नवीन कर्ज देणे सुरू करावे, या मुद्यावर शेतकरी सुकाणू समितीने लढा सुरू केला आहे. 

सुकाणू  समितीने  ज्या  शेतकर्‍यांचे शेतीपंपाच्या वीज बील वसुलीसाठी व थकीत बिलापोटी विद्युत कनेक्शन तोडण्यासाठी विज वितरण कंपनीचे अधिकारी  व कर्मचारी आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन 1 मार्चपासून  महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा 19 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या मरणाचं राजकारण चाललं आहे.सरकारचा निषेध करण्यासाठी दि. 19 रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. 

दि. 23 मार्चपासून शहीद अभिवादन व जागृती यात्रा शेतकरी संघटनेच्या सूकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप   पुणे येथील फुले वाड्यावर होणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात सुमारे 750 सभा होणार आहेत. शेतकरी धोरणांचा निषेध करण्यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाला अटक करा, असे सांगून जामिन घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात येणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस कालिदास आपेट, सिमाताई परदेशी, विकास जाधव, राजेंद्र शिंदे, अंकुश देशमुख, दिपक मोरे व पदाधिकारी उपस्थित होते.