Thu, May 23, 2019 15:22
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातार्‍यात आमदार शिवेंद्रराजे यांचे तुफान

सातार्‍यात आमदार शिवेंद्रराजे यांचे तुफान

Published On: Apr 08 2018 7:34PM | Last Updated: Apr 08 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्यानिमित्ताने सातार्‍यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे तुफान अवतरले. शेकडो दुचाकी व चारचाकी  वाहनांची निघालेल्या प्रचंड रॅलीने शहरातील अवघा माहोल राष्ट्रवादीमय करुन टाकला. यानिमित्ताने आ. शिवेंद्रराजेंनी  जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा रविवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास सातार्‍यात दाखल झाली. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने जोरदार वातावरण निर्मिती केली. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेले जोरदार नियोजन निघालेल्या रॅलीने सार्थकी करुन दाखवले. 

रॅलीसाठी तुफान अवतरणार हे दुपारीच स्पष्ट झाले होते. कार्यकर्ते आपली वाहने घेवून या रॅलीसाठी दुपारी 4 वाजताच सज्ज असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून आले. रॅलीतील वाहनांची पार्किंग व्यवस्था अण्णासाहेब कल्याणी शाळेच्या परिसरात होती. रॅलीला सायंकाळी सव्वासात वाजता शासकीय विश्रामगृहावरुन सुरुवात झाली. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले हल्लाबोलसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वत: स्वागत करत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला.

दरम्यान, रॅलीला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रॅली पोवई नाकामार्गे राजपथावरून राजवाड्यावरील गांधी मैदानावर गेली. रॅली मार्गावर ठिकठिकाणी  स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून दिली. या रॅलीने सातारा शहरातील अवघा माहोल राष्ट्रवादीमय करुन टाकला. सर्वत्र राष्ट्रवादीचे झेंडे, कमानी यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मतदार संघ पिंजून काढला होता. रॅली  व सभेला मिळालेला विराट प्रतिसाद लक्षवेधक ठरला.