Thu, May 28, 2020 17:42होमपेज › Satara › शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी

शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी

Published On: Sep 12 2019 1:52AM | Last Updated: Sep 11 2019 11:43PM
सातारा : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुंबईत असणार्‍या शिवसेना भवनात या मुलाखती पार पडल्या. 
आठ मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 29 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यामध्ये पाटणचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शेखर गोरे, पुरूषोत्तम जाधव, किशोर बाचल या नेत्यांसह इतर प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या मुलाखतीला कोरेगाव मतदारसंघातील सर्वाधिक इच्छुकांनी हजेरी लावली होती. अवघ्या महिन्यावर आलेल्या विधानसभेसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. त्यामुळेच शिवसेनेने मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्हानिहाय प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. खा. अनिल देसाई, रविंद्र नेर्लेकर, श्रीकांत शिंदे, विश्‍वनाथ नेरूळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातून इच्छुकांची मोठी भाऊगर्दी शिवसेना भवन येथे झाली होती. 

यामध्ये वाईमधून डी. एम. बावळेकर, पुरूषोत्तम जाधव, संभाजी सपकाळ, नंदकुमार घाडगे सातार्‍यातून सदाशिव सपकाळ, एस. एस. पार्टे, एकनाथ ओंबळे, सचिन मोहिते, कोरेगावमधून हणमंत चवरे, दत्ताजीराव बर्गे, रणजितसिंह भोसले, प्रताप जाधव, दिनेश बर्गे, किशोर बाचल, बाळासाहेब फाळके, माणमधून शेखर गोरे, धनाजी सावंत, संजय भोसले, बाळासाहेब पाटील-कर्णवार, फलटणमधून बाबूराव माने, कॅप्टन अभिजित अडसूळ, अमोल आवळे, कर्‍हाड उत्तरमधून पतंगराव माने, सुनील पाटील, विनायक भोसले, कर्‍हाड दक्षिणमधून नितीन काशीद, पाटणमधून शंभूराज देसाई, हर्षद कदम, जयवंत शेलार यांनी मुलाखती दिल्या.  दरम्यान, जिल्ह्यात भाजप व शिवसेनेत जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही सेनेतून विधानसभेला इच्छुक असलेल्यांचीही संख्या मोठी आहे. युतीमध्ये ऐनवेळी भाजपने दगा दिल्यास स्वबळाची तयारी असावी म्हणून शिवसेनेने मुलाखती घेतल्या का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.