Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘स्टोल’मुळे नव्हे; ‘शिवशाही’च्या धडकेत मृत्यू 

‘स्टोल’मुळे नव्हे; ‘शिवशाही’च्या धडकेत मृत्यू 

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन जाताना झालेल्या अपघातात सौ. सारिका अभिजीत देशमुख (मूळ रा.शिवथर ता.सातारा सध्या रा.पुणे) या महिलेचा स्टोल दुचाकीत अडकल्यामुळे मृत्यू झाला नसून ‘शिवशाही’ एसटीची पाठीमागून धडक बसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाल्याने तपासाला कलाटणी मिळाली आहेे. दरम्यान, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी सौ.सारिका या मुलीला घेऊन चुलत भावासोबत सातार्‍यात दवाखान्यात आल्या होत्या. दवाखान्यातील काम झाल्यानंतर हे तिघेही (एम एच 11 झेड 4355) या दुचाकीवरुन निघाले होते. ही दुचाकी दुपारी आरटीओ चौकात आली. त्यावेळी ‘शिवशाही’ एसटी (एमएच वाय 2464) याची दुचाकीला पाठीमागून धडक बसली. यामुळे दुचाकीला अपघात होऊन त्यावरील तिघेही खाली पडले. 

दुर्दैवाने सौ.सारिका देशमुख यांना गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या.अपघातानंतर दुचाकीस्वारालाही या घटनेने मानसिक धक्का बसला. तसेच पाठीमागून एका वाहनाची धडक बसली असल्याचे त्यांच्या जबाबात आले. शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची खात्री करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्येही पाहण्याचा प्रयत्न केला असता एका फुटेजमध्ये दुचाकीला ‘शिवशाही’ची धडक बसली असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, अपघाताच्या घटनेदिवशी घटनास्थळावरुन सारिका यांच्या गळ्यातील स्टोल दुचाकीच्या चाकात अडकला असावा. तो स्टोल दुचाकीच्या चाकामध्ये गुंडाळला गेल्याने दुचाकीचे चाक जॅम झाले असावे व अपघात झाला असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तसेच हा अपघात एवढा भीषण होता की, सौ.सारिका या जमिनीवर आदळल्या गेल्या व पोटातून थोडी आतडी बाहेर आली होती. दुसरीकडे त्यांची मुलगी व दुचाकीस्वार ही बाजूला फेकले गेले व बचावले.

 अपघात पाहून परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली व बघ्यांची गर्दी उसळली. नागरिकांनी तत्काळ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची पाहणी करुन जखमींची माहिती घेतली. सौ.सारिका यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.