होमपेज › Satara › शिरवळच्या चंदर टोळीला मोक्का

शिरवळच्या चंदर टोळीला मोक्का

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 11:08PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा लॉकअपमधून पळून गेलेला व दरोड्याची तयारी, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तिघांच्या टोळीने शिरवळ येथे चेन स्नॅचिंग केले असून, संशयितांमध्ये जनावराच्या डॉक्टरचाही समावेश आहे.

चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे  (मूळ रा. ढवळ, ता. फलटण, सध्या रा. शिर्के पेपर मिलजवळ, शिरवळ, ता. खंडाळा), नीलेश बाळासो निकाळजे (रा. सोनगाव, ता. फलटण), अक्षय शिवाजी खताळ (रा. बिभी, ता. फलटण) अशी तिघांची नावे आहेत. यातील नीलेश निकाळजे हा जनावरांचा डॉक्टर आहे. संशयित तिघांनी 27 एप्रिल रोजी शिरवळ येथे महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग केले होते. पोलिसांनी चंदर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला होता. संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिरवळ, लोणंद, फलटण, खंडाळा, सातारा, कळंबोली, पनवेल (जि. रायगड) या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चंदर हा सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधूनही पळून गेला होता. चंदर हा टोळी चालवून तो स्वत:चा व टोळीतील सदस्यांचा आर्थिक फायदा करून घेत होता. सातारा एलसीबी व शिरवळ पोलिसांनी सर्व तपास  केल्यानंतर पो.नि. भाऊसाहेब पाटील यांनी संशयितांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजूर केला.