Tue, May 26, 2020 17:15होमपेज › Satara › राष्ट्रवादीचे आज सातार्‍यात शक्‍तिप्रदर्शन

राष्ट्रवादीचे आज सातार्‍यात शक्‍तिप्रदर्शन

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 10:47PM

खा. शरद पवारसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार रविवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची पडझड झाल्यानंतर ते पहिल्यादांच सातार्‍यात येत असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जोरदार शक्‍तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. खा. शरद पवार यांच्या जंगी स्वागतासाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

सातारा  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला आहे. श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हातात घेतले आहे. दोन्ही राजांच्या भाजपा पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार रविवारी सकाळीच सातार्‍यात दाखल होत आहेत.

त्यांच्या   स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी जंगी तयारी केली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका व मेळावे घेवून शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक तरूण सरसावले आहेत. पवार यांच्या मार्गात ठिकठिकाणीही स्वागत होणार आहे. खा. शरद पवार यांचे सातार्‍यात आगमन होताच राष्ट्रवादी भवनात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागतानंतर ते रयत शिक्षण संस्थेच्या  कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमांनतर ते एका खासगी कार्यक्रमालाही जाणार आहेत. त्यानंतर त्यांचे पोवईनाका येथे आगमन होणार असून ते शिवतीर्थावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

त्यानंतर  मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातूनही  शक्‍तीप्रदर्शन केले जाणार  आहे. ही रॅली पोवईनाका, अजिंक्य कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम भवन, जिल्हा परिषदमार्गे बॉम्बे रेस्टॉरंट व पुढे कल्याण रिसॉर्ट येथे जाणार आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार हे भाजपाला रामराम करत आपल्या शिलेदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल होणार आहेत. या मेळाव्यात खा. शरद पवार भाजपवासी झालेल्या  दोन्ही राजांवर काय बोलणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.