Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Satara › 'व्हिडीओ क्लिप' ची भीती घालून १० लाखासाठी ब्लॅकमेल

'व्हिडीओ क्लिप' ची भीती घालून १० लाखासाठी ब्लॅकमेल

Published On: Jul 18 2018 6:32PM | Last Updated: Jul 18 2018 8:12PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत एकत्र काम करत असताना तेथील वरिष्‍ठाने एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक अत्‍याचार केले. तसेच त्‍याने याचा व्हिडीओही बनवला. संबधीत महिलेचा  विवाह झाल्यावरनंतर 10 लाख रुपये मागून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अशोक तुळशीदास यादव (रा.खिंडवाडी ता.सातारा) याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातार्‍यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला विवाहिता आहे. 2008 मध्ये तक्रारदार त्यावेळी सातारा एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामाला होती. संशयित हा त्या कंपनीमध्ये सिनीअर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर होता. महिला कामाला लागल्यानंतर संशयित अशोक यादव त्या महिलेला वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अशोक यादव हा वारंवार महिलेचा पाठलग करुन दुचाकीवरुन लिफ्ट देण्याचा बहाणा करत होता. अशातच त्याने लग्नाचीही मागणी घातली. वारंवार पाठलग होत असल्याने अखेर तक्रारदार महिलेने भावाला याबाबतची माहिती देवून ते दोघे संशयित अशोक यादव याला भेटले. दोघांनी भेटून लग्नासाठी नकार दिला व पुन्हा त्रास देवू नको, असेही बजावले. या घटनेनंतर त्याने चूक झाल्याचे मान्य केले पुन्हा असे करणार नाही अशी ग्वाही दिली.
संशयित अशोक यादव याने त्यानंतर महिलेला आपण मित्र राहू असे म्हणून पुन्हा पाठलग करुन त्रास देवू लागला. अखेर या घटनेमळे महिलने त्या कंपनीचा राजीनामा दिला व दुसर्‍या कंपनीमध्ये कामाला लागली. संशयिताने तक्रारदार महिलेची सर्व माहिती घेतली व 2010 मध्ये घरात कोणीच नसल्याचे पाहून घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग केला. हे कृत्य करताना त्‍याने मोबाईलवर व्हिडीओ शुटींग केले. संशयिताने ‘तू जर ही बाब कोणाला सांगितली तर हे व्हिडीओ शुटींग व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली.

व्हिडीओ शुटींग असल्याचे सांगत त्याने वेळोवेळी ठिकठिकाणी बलात्कार केला. याच दरम्यान, संशयिताने लग्न केले मात्र ते लग्न फार काळ टिकले नाही. या घटनेनंतरही तो वेळोवेळी ब्लॅकमेल करुन बलात्कार करत होता. तक्रारदार महिलनेने या कृत्यापासून सुटका करण्याची विनंती केली. या त्रासातून सुटका होण्यासाठी महिलेनेही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र जे स्थळ येत होते त्यांना संशयित दोघांमध्ये संबंध असल्याचे सांगून तो विवाह मोडत होता. अशापध्दतीने सुमारे चार विवाह त्याने तक्रारदार महिलेचे मोडले आहेत.

अखेर संशयिताने महिलेला विवाह करण्यास सांगितले. मात्र तो जेव्हा बोलावेल तेव्हा त्याला वेळ देण्याच्या अटीवर. त्यानुसार तक्रारदार महिलेने मे 2018 मध्ये विवाह केला. या विवाहावेळी संशयिताने त्याचा भाउ शिवाजी यादव याला पाठवून तक्रारदार महिलेला निरोप दिला होता. महिलेचा विवाह झाल्यानंतर आठ दिवसातच अशोक यादव याने 10 लाख रुपयांची मागणी केली अन्यथा, तो व्हिडीओ पतीला पाठवणार असल्याची धमकी व्हाटसअप मेसेज करुन दिली.

या सर्व त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयिताची माहिती घेवून मंगळवारी रात्री उशीरा त्याला अटक केली. बुधवारी संशयित अशोक यादव याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.