Sat, May 25, 2019 22:59होमपेज › Satara › युवकांनी शिवनीतीचे आचरण करावे

युवकांनी शिवनीतीचे आचरण करावे

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 11:02PMसातारा : प्रतिनिधी

सुमारे 400 वर्षांपूर्वी युद्धकला आणि युद्धनीती कशी होती तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही. त्यामुळे राजधानी महोत्सवातील शिवजागर या कार्यक्रमामधून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा घेतलेला उपक्रम निश्‍चितच ऐतिहासिक काळात घेऊन जाणारा ठरला. किल्ले अजिंक्यतारा- सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती, आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमामधून आणि जाज्वल्य इतिहासामधून बोध घेऊन, आधुनिक संगणकीय युगामध्ये युवकांनी शिवनीती आचरणात आणून चौफेर प्रगती करावी, असे आवाहन सातारच्या राजमाता श्री  छ. कल्पनाराजे भोसले यांनी केले.

राजधानी सातारा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शिवजागर कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खा. श्री छ.उदयनराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रेरणास्थान संभाजी भिडे गुरुजी, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राजमाता श्री छ. कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, राजधानी महोत्सव हा सातारा जिल्हावासियांचा महोत्सव आहे. या महोत्सवाच्या उपक्रमातून युवकांसह सर्वांना जीवनाची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजागरसह युवागिरी आणि सातारा गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा प्रत्येक सातारकर नागरिकांनी आणि महिलांनी लाभ घ्यावा.यावेळी शिवकालीन पोवाडे, मर्दानी खेळ तसेच शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास उपस्थित अबालवृद्धांनी भरभरुन दाद दिली.

यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सातारचा बालकलाकार कुमार वीरेन पवार याने आपल्या खणखणीत आवाजात पोवाडा सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांचे स्वागत खा. श्री छ. उदयनराजे भोसले फाऊंडेशन ऑफ कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी आणि पंकज  चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने पंकज चव्हाण व मान्यवरांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, सुनील सावंत, संदीप शिंदे, बाळासाहेब गोसावी, नगरसेवक दत्तात्रय बनकर, संजय शिंदे, संजय पाटील, किशोर शिंदे, राजू भोसले, बबलु साळुंखे, नगरसेविका स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडिक, संग्राम बर्गे, काका धुमाळ, गणेश जाधव, आर.वाय. जाधव, अ‍ॅड. अंकुश जाधव, अ‍ॅड. विकास पवार, बाळासाहेब चोरगे, प्रताप शिंदे, सुनील बर्गे, शुभम ढोरे, हर्षल माने, सौरभ सुपेकर, राजू गोडसे, रवींद्र झूटिंग, सौ.गीतांजली कदम, नगरिक तसेच शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. सौ.माधवी कदम यांनी आभार मानले. 
दरम्यान,दि.  26 मे रोजी युवागिरी हा गीतसंगीताचा खास युवकांसाठी कार्यक्रम आयोजित केला असून रविवार दिनांक 27 मे रोजी प्रतिष्ठेच्या शिवसन्मान पुरस्कारासह, सातारा गौरव पुरस्काराचे वितरण व पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचा स्टेप-अप हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शाहू स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता होणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयासमोरील मैदान, भू-विकास बँक व हुतात्मा परिसर व एम्लॉयमेंट ऑफिस परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.