Wed, Apr 24, 2019 21:41होमपेज › Satara › साद... नखरेल रंगोत्सवाची

साद... नखरेल रंगोत्सवाची

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:22PMसातारा : संजीव कदम

कधी भुरभुरणारा पाऊस तर कधी अचानक पडणारे ऊन अशी गेल्या काही दिवसांपासून अडखळत सुरुवात करणार्‍या पावसाने आता कुठे बरसायला प्रारंभ केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कडेकपार्‍यांमध्ये त्यामुळे निसर्गाची उधळण सुरु झाली असून हा नखरेल रंगोत्सव आता साद घालू लागला आहे. 

मृगाचा बेभरवशी कारभार यंदाही अनुभवयाला मिळाला. मात्र डगमगत का होईना स्थिर होवू पाहणार्‍या पावसाने निसर्गाचे रुपडे मात्र पालटू लागले आहे.  जिल्ह्यातील कास-ठोसेघर, बामणोली, पाचगणी, महाबळेश्‍वर, कोयनानगर ही पर्यटनस्थळे हिरवळू लागली आहेत. डोंगर-दर्‍यांनी व्यापलेला हा परिसर नववधूसारखा नटू लागला आहे. या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांबरोबर स्थानिकांचाही लोंढा आता सुरु होईल.  निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा,  याचा मनमुराद आनंद लुटला जाणार असून  त्यासाठी कासची नवलाई सजू लागली आहे. धुक्याने  पांघरलेली शाल, अधून-मधून होणारी पर्जन्यवृष्टी, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारी सळसळती तरुणाई चिंब - चिंब होऊन बागडताना आता पहावयास मिळणार असून पर्यटकांमुळे या पर्यटनस्थळांना बहार येणार आहे. कास परिसरात हिरवा गालिचा पसरु लागला आहे. रानफुले फुलू लागली असून लवकरच सर्वत्र  फुलांचा सडा शिंपल्याचा भास होण्याइतपत पठार फुलणार आहे. येथील वाराही सुसाट वेगाने मदमस्त बेधुंदपणे वाहू लागला आहे. पठारावर विविध फुलांच्या रंगछटा  पूर्ण बहरण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. त्यानंतरच कास पठार, भांबवली वजराई धबधबा, कास तलाव, कुमुदिनी तलाव, बामणोली  तसेच निसर्ग भ्रमंती पाहण्यासाठी खरा रंग येणार आहे.