होमपेज › Satara › कारवाई दिवशी ड्रॉवरमध्ये 80 हजार कसे?

कारवाई दिवशी ड्रॉवरमध्ये 80 हजार कसे?

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 11 2018 12:48AMसातारा : प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाली, त्या दिवशी त्यांच्याच ड्रॉवरमध्ये 80 हजारांची रोकडही सापडली होती. त्यामुळे एसीबी विभागही चक्रावला असून त्यांच्या ड्रॉवरमध्ये एवढी मोठी रक्कम आली कोठून? आणखी कुणी लाच दिली होती का? असे असेल तर हे लाच देणारे कोण? कशासाठी दिली असेल एवढी रक्कम? असे विविध प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यादृष्टीने आता तपासाची चक्रे फिरवावी लागणार आहेत. दरम्यान, पुनिता गुरव यांना गुरुवारी जामीन झाला असून पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत. 

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक तथा एसीबीने सोमवारी सायंकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली. वेतनश्रेणी फरक बिल काढून तो मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव व महाबळेश्‍वरच्या गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना भेटले असता दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. सोमवारी कारवाई झाल्यानंतर एसीबीने लाचेचे दहा हजार रुपये जप्त केले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करत असतानाच एसीबीला पुनिता गुरव यांच्या ड्रॉवरमध्ये आणखी 80 हजार रुपये सापडले. या घटनेने एसीबीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आणखी चक्रावून गेले. प्रोसिजरनुसार एसीबी विभागाने ते 80 हजार रुपयेही ताब्यात घेवून एकूण 90 हजार रुपये जप्त केले आहेत.

पुनिता गुरव यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. गुरुवारी पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांना त्यांना जामीन मंजूर केला. मात्र अद्याप वंदना वळवी पसार आहेत तसेच या घटनेचा तपास शिल्लक असल्याने न्यायाधिशांनी पुढील तपासासाठी पुनिता गुरव यांना आठवड्यातून एकदा एसीबी विभागात हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोनि अरिफा मुल्ला या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

समाधानकारक उत्तर नसल्याने रक्कम जप्त..
पुनिता गुरव यांनी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरव यांच्या केबिनची झाडाझडती घेतली असता आणखी 80 हजार रुपये सापडले. पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतल्यानंतर गुरव यांना घाम फुटला. घटनास्थळीच पोलिसांनी 80 हजार रुपयांबाबत विचारणा केली. मात्र, गुरव यांनी त्याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे अंतिमत: पोलिसांनी ती रक्कमही जप्त केली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली.