Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Satara › सातारा : महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक कोंडी

सातारा : महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक कोंडी

Published On: May 20 2018 11:18AM | Last Updated: May 20 2018 11:18AMओझर्डे : वार्ताहर 

पुणे सातारा महामार्गावरील बदेवाडी गावच्या हद्दीतील वळणावर अवजड मालवाहू कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाला. यामुळे वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशीही वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागला. 

पुणे सातारा महामार्गावरून कंटेनर (टी. एन 01 बी. के. 9079) हा ऑईलने भरलेली 8 हजार लिटरची टाकी,  2 हजार किलो वजनाचे ट्रान्स्फॉर्मर व काचांचे किट असा अंदाजे 13 टन माल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने भरघाव वेगाने निघाला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा ट्रेलर बदेवाडी (ता. वाई) च्या हद्दीत सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामा शेजारून वाहतूक सर्व्हिस रस्त्याकडे वळवलेल्या वळणावर आला असता त्याचवेळी ट्रेेलरला झोला बसल्याने चालकाचा ताबा  सुटून हा ट्रेलर रस्त्यावर आडवा झाला.त्यावरील ऑईल टँक व इतर साहित्य महामार्गावर विखरून पडले. ट्रेलर  रस्त्याकडेचा कठडा तोडून महामार्गावर आडवा झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.  महामार्ग पोलिस तब्बल तीन तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्‍त केला जात होता. 

हे अवजड वाहन सरळ करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडे कसलीच सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरच्या तालुक्यातून क्रेन मागवून 10 वाजता हा आडवा झालेला ट्रेलर बाजूला काढून सातारकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद भुइर्ंज पोलिस ठाण्यात झाली आहे. सुदैवाने या अपघातावेळी ट्रेलरसमोर कोणतेही वाहन नव्हते नाहीतर अनर्थ घडला  असता.