Thu, Aug 22, 2019 04:09होमपेज › Satara › ‘पोस्ट’चे आधार केंद्र निराधार

‘पोस्ट’चे आधार केंद्र निराधार

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 10:36PM

बुकमार्क करा

सातारा: प्रतिनिधी

कोणत्याही शासकीय किंवा खासगी कामासाठी आता आधार कार्ड असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आधार कार्ड नवीन काढणे अथवा दुरूस्ती करणे यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. फक्त शासन मान्यता महा ई सेवा केंद्रांमध्ये व पोस्ट ऑफीसमध्ये ही सेवा देण्यात येत आहे. मात्र, सातार्‍यातील पोस्ट ऑफीस याला अपवाद आहे. या ठिकाणी आधार दुरूस्ती केंद्र असा बाहेर भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. मात्र, हे केंद्रच सुरू नसल्याने  ते फक्त शोपीस बनले आहे. 

केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे आधारकार्ड हे प्रत्येक गोष्टींसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन आधार कार्ड काढणे व त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी गेल्या महिन्यापर्यंत खासगी कंपन्यांना काम दिले होते होते. मात्र, आता नागरिकांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाने  आधार संदर्भातील काम हे फक्त महा ई सेवा केंद्रातच होईल, असा फतवा काढला आहे. सातारा तालुक्यात 37 तर शहरामध्ये अवघी 10 महा ई सेवा केंद्र आहे. या सर्व केंद्रांवर भली मोठी रांग रोजच दिसत आहे. 

त्यामुळे आधार कार्डचे काम करावयाचे झाल्यास अख्खा दिवस खर्ची घालावा लागतो. महा ई सेवा केंद्रांप्रमाणेच पोस्ट ऑफीसमध्येही ही सुविधा देण्यात येत आहे. त्यानुसार प्रातिनिधीक स्वरूपात ही सेवा देण्यास सुरूवातही केली. त्यासाठी पोस्ट ऑफीस कार्यालयाबाहेर आधार दुरूस्ती केंद्र असा भला मोठा फ्लेक्स लावला आहे. हा फ्लेक्स पाहिल्यानंतर नागरिका कार्यालयात जातात. मात्र, या नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे.या ठिकाणचे आधार कार्ड दुरूस्ती केंद्र मागील 15 दिवसांपासून बंदच आहे. कार्यालयातच एका बाजूला हे केंद्र तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी संगणक, प्रिंटर व स्कॅनर असे सर्व साहित्यही आहे. मात्र, त्या ठिकाणी कर्मचारीच नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे.

याबाबत पोस्ट ऑफीसमध्ये विचारणा केल्यास फक्त टोलवा टोलवी केली जात आहे. ठोस असे उत्तरच देण्यात येत नाही. या केंद्रातून नागरिकांना कोणतीच सुविधा देता येत नसल्याने हे केंद्र फक्त शोपीस बनले आहे. याबाबत संबधितांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ हे केंद्र सुरू करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.