होमपेज › Satara › सातार्‍यात जुगार अड्डा उद्ध्वस्त

सातार्‍यात जुगार अड्डा उद्ध्वस्त

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:37PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरातील प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, संगमनगर कॅनॉल, क्षेत्रमाहुली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत 3 जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी 6 जणांना अटक केली असून सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्यांमध्ये रोकड, रिक्षा, दुचाकी व मोबाईल यांचा समावेश आहे. दरम्यान, देगाव फाटा येथे पोलिसांबाबतची पूर्वसूचना देणारा सायरन वाजवून जुगार अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी हा अड्डा नेस्तानाबुत केला आहे.

युवराज रामचंद्र जाधव (वय 35), अभिमान जालिंदर ओव्हाळ (वय 41), राम किसन साठे (वय 21, तिघे रा. प्रतापसिंहनगर), अनिल सुरेश माने (वय 30, रा. विकासनगर), ऋषभ संजय मोरे (वय 20, रा. पाटीलवाडा, गोजेगाव), नितीन मल्हारी विधाते (वय 45, रा. सोनगाव तर्फ माहुली, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, चंदू चोरगे, अमर बनसोड, मनोज बनसोड, धनंजय बनसोड हे देगाव फाटा येथून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरात जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन पथकांच्या माध्यमातून एकाचवेळी धाडी टाकल्या. देगाव फाटा येथे टपर्‍यांच्या आडोशाला मोकळ्या जागेत जुगार सुरु असताना शहर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित चौघेजण तेथून पसार झाले. पोलिसांना एक संशयास्पद रिक्षा आढळल्यानंतर त्यामध्ये पाहणी केली असता जुगाराचे साहित्य सापडले. जुगार अड्ड्याची तपासणी सुरु असतानाच अचानक सायरन वाजू लागल्याचा आवाज आल्याने पोलिस गडबडून गेले. पोनि नारायण सारंगकर यांनी याचा छडा लावला असता धक्कादायक माहिती समोर आली.

या परिसरात पोलिस व्हॅन आल्यानंतर सायरन वाजवला जातो. या सायरनचे रिमोट अड्ड्यापासून काही अंतरावर ठेवण्यात आला आहे. व त्यासाठी काही खास माणसांची नियुक्ती केली असून पोलिस आले की ते रिमोटद्वारे सायरन वाजवतात. सायरन वाजला की जुगार बहाद्दर अड्ड्यावरुन पळून जातात. गुरुवारी रेड टाकण्यापूर्वी पोलिस गेल्यानंतर असाच प्रकार झाल्याने संशयित आरोपी तेथून पसार झाले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 50 हजार रुपयांची रिक्षा, जुगाराचे साहित्य, सायरन जप्त केला आहे.

संगमनगर कॅनॉल येथेही पोलिसांनी जुगार अड्डा सुरु असतानाच छापा टाकला असता त्याठिकाणी संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रोख 40 हजार 900 रुपये, जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला. क्षेत्रमाहुली येथेही पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी 3 दुचाकी, मोबाईल, खुर्ची, टेबल असा 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापासत्र राबवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कारवाई करुन संशयित सर्वांना पोलिस व्हॅनमध्ये घातले जात असताना बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. संशयितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रोबेशनरी एसपी पवन बनसोड, पोनि पद्माकर घनवट, पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, पोलिस हवालदार मोहन घोरपडे, विलास नागे, उत्तम दबडे, विजय शिर्के, तानाजी माने, रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, रवि वाघमारे, रुपेश कारंडे, नितीन भोसले, संतोष जाधव, नितीन गोगावले, निलेश काटकर, प्रवीण कडव, संजय जाधव, गणेश कचरे, राहुल खाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.