Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Satara › पोलिस भरतीवेळी धावणार्‍यांची चुकीची वेळ नोंदवली

पोलिस भरतीवेळी धावणार्‍यांची चुकीची वेळ नोंदवली

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 17 2018 1:13AMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सुरु असणार्‍या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या धावण्याची चाचणी पूर्ण केल्याची वेळ  नोंदणीच्या नेमणुकीसाठी असलेली महिला पोलीस कर्मचारी चुकीची सांगत असल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. याप्रकाराची गंभीर दखल घेत त्या महिला कर्मचार्‍याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले. 

जिल्हा पोलीस दलातील रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून पोलीस परेड ग्राउंडवर सुरु आहे. नियोजित वेळापत्रकानुसार दररोज 1 हजार उमेदवारांना भरतीसाठी प्रवेशपत्र देण्यात आली आहेत. कागदपत्रांची छानणी, पडताळणी केल्यानंतर त्यांची शारिरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात येते. यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी पोलिस अधिकारी, स्वतंत्र कर्मचारी तैनात असून संपुर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींगही केले जात आहे. शुक्रवारी पुरुष गटातील उमेदवारांना  नेमुन दिलेल्या धावण्याचे अंतर पुर्ण केल्यानंतर त्याची वेळ टिपण्यासाठी आणि नोंद करण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका महिला कर्मचार्‍याकडे स्टॉप वॉच तर दुसर्‍या महिला पोलिसाकडे नोंदीचे काम होते. धावण्याची चाचणी किती वेळात कोणत्या उमेदवाराने पुर्ण केली याची माहिती स्टॉप वॉचच्या मदतीने देण्याचे काम त्याठिकाणची महिला कर्मचारी करत होती.

भरती प्रक्रीया सुरु असतानाच महिला पोलिस चुकीची वेळ नोंदीसाठी सांगत असल्याचे त्याठिकाणी तैनात असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आले. ही बाब गंभीर असल्याने त्या महिला कर्मचार्‍याकडील ते काम थांबवण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना याबाबतची माहिती दिली. पोलिस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेवून तत्काळ त्या महिला पोलिस कर्मचार्‍याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

Tags : satara, satara news, police recruitment, Run Time Test Registration Incorrect,