Tue, May 21, 2019 12:50होमपेज › Satara › सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूकीचे पैसे दिले मिळवून

सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूकीचे पैसे दिले मिळवून

Published On: Apr 24 2018 5:24PM | Last Updated: Apr 24 2018 5:24PMसातारा : प्रतिनिधी

हॉटेल चालकाला पार्सल ऑर्डर देण्यासाठी व पैसे ऑनलाईन पाठवत असल्याचे खोटे सांगून एटीएम, ओटीपीद्वारे 21 हजार 690 रूपयांची फसवणूक करण्यात आली. मात्र तक्रारदार हॉटेल चालकाने तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर अवघ्या 48 तासात सायबर पोलिसांनी हॉटेल चालकाचे सर्व पैसे परत मिळवून दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 21 रोजी सातारा तालुक्यातील एका हॉटेल चालकाला अज्ञाताने फोन केला. पार्सल ऑर्डर केले असल्याचे सांगून त्याचे पैसे देण्यासाठी एटीएम क्रमांक व ओटीपी क्रमांकही मागितला. ओटीपी क्रमांक दिल्यानंतर हॉटेल चालकाला मोबाईलवर त्यांनी 21 हजार 690 रुपयांची खरेदी केली असल्याचा मेसेज आला. यानंतर हॉटेल चालकाला फसवणुक झाल्‍याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ सातारा सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी हॉटेल चालकाकडून बँक खात्याचे स्टेटमेंट, अनोळखीचा आलेला एसएमएस हे पाहून तपासाला सुरूवात केली. ऑनलाईन संकेतस्थळावरून एका कंपनीतून खरेदी झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिसांनी त्या कंपनीशी संपर्क साधून ट्रान्झेक्शनद्वारे हा व्यवहार फसवणूकीतून झाले असल्याचे सांगून तो रद्द करण्याची सूचना दिली. संबंधित खरेदी मध्यप्रदेश येथील इंदौर येथून निघणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशीही संपर्क साधून तो व्यवहार रद्द करण्याची सूचना दिली. सर्व व्यवहार रद्द झाल्यानंतर सातार्‍यातील तक्रारदार हॉटेल चालकाच्या खात्यामध्ये सर्वच्या सर्व 21 हजार 690 रूपये पुन्हा जमा झाले.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट, सपोनि गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, निखिल जाधव यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.