Fri, Apr 26, 2019 02:09होमपेज › Satara › ‘पोलिसदादांची दोस्ती तुटायची नाय...’

‘पोलिसदादांची दोस्ती तुटायची नाय...’

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:00PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

दोन वर्षापूर्वी महामार्गावरील हादरवून सोडणार्‍या दुर्घटनेत ‘ऑन ड्युटी’ असताना जायबंदी झालेले पोलिस कर्मचारी अमोल कांबळे  अद्याप अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहेत. आपला पोलिस मित्र लवकर बरा व्हावा, त्याला मोटिव्हेट करता यावे, यासाठी त्याचे सहकारी पोलिस मित्र दरवर्षी अमोलचा वाढदिवस त्याच्याच घरी जावून साजरा करत आहेत. पोलिस दलातील हा जिव्हाळा म्हणजे ‘ही दोस्ती तुटायची नाय..’ असाच प्रत्यय आणून देत आहे.

आज सर्वत्र मैत्रीदिन साजरा होत आहे. त्यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. या दिवशी अशाच एका अतुट मैत्रीचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. दि. 16 सप्टेबर 2016 रोजी सातारानजीक महामार्गावरील रायगाव फाटा येथे कार कंटेनरमध्ये घुसून अपघात झाला होता. अपघातग्रस्त कार कंटेनरमधून काढण्यासाठी ‘ऑन ड्युटी’वर असताना सातारा पोलिस दलातील कर्मचारी अमोल कांबळे हे इतर कर्मचार्‍यांसोबत मदतीसाठी गेले होते. पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच एका ट्रॅव्हल्सची मदत करणार्‍या पोलिसांना धडक बसल्याने पुन्हा त्याठिकाणी अपघात होवून एक पोलिस जागीच ठार झाला होता. या दुर्घटनेत अमोल कांबळे हे पण गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते आजही अंथरुणाशी खिळून आहेत. बेताची परिस्थिती असलेल्या या पोलिसाच्या कुटुंबाची आजही अक्षरश: फरफट सुरु आहेे.

भीषण अपघातानंतर उपचाराच्या कालावधीत अमोल यांच्यावर पुणे व सातारा येथे तब्बल 9 लाख रुपये खर्च झाले. यातील बहुतांशी रक्कम ही महाराष्ट्र पोलिस दलाकडून पोलिस संजीवनी योजनेंतर्गत मदत करण्यात आली.  पुणे येथील उपचार झाल्यानंतर अमोल बोलणार कधी? चालणार कधी? पोलिस दल जॉईन करणार कधी? याबाबत वैद्यकीय अधिकारीही सांगू शकले नाहीत. अपघातापासून अमोल यांना औषधासाठी महिन्याला मोठा खर्च होत असल्याचे समोर आले. दै.‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त प्रसिध्द करताच सातारा जिल्हा केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला. जोपर्यंत अमोल ठीक होत नाही तोपर्यंत त्यांना जी औषधे लागतील ती पुरवली जातील किंवा औषधे खरेदी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना धनादेश (चेक) दिला जाईल, असे केमिस्ट असोसिएशनने जाहीर केले. गेल्या दीड वर्षापासून अमोल यांच्या औषधांचा खर्च केमिस्ट संघटनाच करत आहे. अमोल कांबळे घरातील एकमेव कमवती व्यक्ती आहेे. त्यांचे आई-वडील थकलेले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाची वाताहत होवू नये, यासाठी समाजातील अनेक घटक पुढे आले व त्यांना आर्थिक मदतही दिली. दरम्यान, अमोल या संकटातून बाहेर यावा यासाठी पोलिस दलातील मित्रपरिवार त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आवर्जून भेटतात. अमोलच्या हालचाली वेगाने वाढाव्यात तो बोलावा, चालावा यासाठी पोलिस दलातील त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी जातात, हर तर्‍हेने प्रयत्न करतात. वाढदिनी मित्रत्वाचा जमा होणारा हा गोतावळा अमोलला सोळा हत्तीचं बळ देवून जात आहे.