Thu, Aug 22, 2019 13:19होमपेज › Satara › पोलिस दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

पोलिस दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:13PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस दलातील पती-पत्नी असणार्‍या पोलिसांनी एकाची 10 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राणी विष्णू मोहिते व सचिन धनाजी फाळके (दोघे सध्या रा. सिटी पोलिस लाईन, मूळ रा. पोगरवाडी ता. सातारा) असे पोलिस पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांकडूनच फसवणूक झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

महारुद्र ज्ञानदेव कानडे (वय 33, रा. गोडोली) यांनी याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस कर्मचारी राणी मोहिते व तक्रारदार महारुद्र कानडे यांची ओळख आहे. पोलिस राणी यांना पैशांची गरज असल्याने दि. 19 सप्टेंबर 2016 पासून त्यांनी महारुद्र कानडे यांना उसने पैसे मागितले. ओळखीचे असल्याने तक्रारदार यांनी उसने पैसे देतो, असे सांगितले.

सात लाख रुपये उसने घेतल्यानंतर तक्रारदार कानडे यांनी काही कालावधीनंतर पैसे मागितले. उसने घेतलेले पैसे नंतर देतो असे सांगून पोलिस पती-पत्नीने चालढकल करण्यास सुरुवात केली. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने अखेर राणी मोहिते व सचिन फाळके यांनी त्यांचा एक फ्लॅट असल्याचे सांगून 7 लाख रुपये देता येत नसल्याने त्याबाबत फ्लॅट विकत घेण्याची विनंती केली. पैशांऐवजी फ्लॅट मिळत असल्याने तक्रारदार महारुद्र कानडे फ्लॅट घेण्यासाठी तयार झाले.

चर्चेअंती फ्लॅटची मूळ किंमत 13 लाख रुपये असल्याचे संशयित पोलिस पत्नी-पत्नीने सांगितल्यानंतर त्यांना आणखी वर ज्यादा पैसे देण्यात आले. याबाबत तहसीलदार कार्यालयात साठेखतही झाले. दरम्यान, संबंधित फ्लॅटवर एलआयसीचे तब्बल 16 लाख 50 हजार रुपये व व्याज 2 लाख 87 हजार रुपये असल्याचे समोर आले. फ्लॅटवर कर्ज असल्याने पोलिस पती-पत्नीने फसवणूक केले असल्याचे समोर आल्याने तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तक्रारदार यांची सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर अखेर शनिवारी दुपारी तक्रारदार महारुद्र कानडे यांनी तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पती-पत्नी पोलिसांविरुध्दच फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस दलात त्याबाबत चर्चा सुरु होती. यातील राणी मोहिते या पोलिस नियंत्रण कक्षात तर पती सुनील फाळके हे जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.

पोलिसाने व्याजाचे पैसे दिले...

पोलिस पत्नीने यावेळी त्यांची बाजू प्रसिध्दी माध्यमांकडे सांगितली असून तक्रारदार कानडे याने उसने पैसे दिल्याचे मान्य केले आहे. मात्र त्याबाबत तडजोड सुरु असून मंगळवारपर्यंत पैसे देण्याचे ठरले होते. पैशांची नड असताना त्याने दिले मात्र त्याचे त्याला व्याज दिलेले आहे. असे असतानाही तक्रारदार याने फसवणूकीची तक्रार दिली आहे. यामुळे आमचीही तक्रार असून त्याने सावकारी पध्दतीने पैसे दिले असून तसे व्याजही घेतले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे पोलिस पत्नी राणी मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, या सर्वप्रकारामुळे कमालीचा ट्विस्ट निर्माण झाला आहे.