Sun, Sep 23, 2018 04:02



होमपेज › Satara › पोलिसांची हप्तेगिरी कॅमेर्‍यात कैद

पोलिसांची हप्तेगिरी कॅमेर्‍यात कैद

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:47PM



सातारा : प्रतिनिधी  

रहिमतपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याने ट्रकचालकाकडून  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून हप्ता उकळला. याबाबतचे व्हिडीओ चित्रीकरण जिल्हा पोलिस प्रमुखांना सादर करण्यात आले असून, हप्तेखोर पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दै. ‘पुढारी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे पोलिस दलातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली असून पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली.

रहिमतपूर पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस वाहनचालक चव्हाण हे संबंधित व्हिडीओ क्लीपमध्ये पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबत रोहन दिलीप पवार (रा. रहिमतपूर) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील व दै. ‘पुढारी’कडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे. संबंधित व्हिडीओ क्लीपही सादर करण्यात आली आहे. रहिमतपूर येथील रोहन दिलीप पवार यांचा मालट्रक वाहतूक ट्रक आहे. त्यांना रहिमतपूर पोलिस ठाण्यात पोलिस गाडीवर चालक असणारे चव्हाण     यांनी वारंवार  खोट्या गुन्ह्यात तुझी गाडी अडकवीन  आशी धमकी देवून 10,000 रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या  पवार यांनी तक्रार देण्यासाठी दि. 16 जानेवारीला दुपारी 1 वाजता मित्र रणजीत माने यांच्यासह सातारा येथील लाचलुचपत  प्रतिबंधक कार्यालय गाठले.  मात्र तेथील वरिष्ठ अधिकारी कुरुळेे  परगावी  मिटिंगला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर कार्यालय कर्मचारी माने मॅडम यांनी कार्यालयीन दुरध्वनीवरुन कुरुळे यांच्याशी संवाद साधून दिला. यावेळी  त्यांना सर्व हकिकत व तक्रार कथन केली. त्यावर कुरुळेे यांनी संबंधित व्यक्तीकडे तक्रारकर्त्याचे शासकीय काम प्रलंबित असल्यास आम्ही ट्रॅप करु शकतो, असे सांगितले. त्यामुळे मित्रासह ते परत रहिमतपूरला आले. सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान रहिमतपूर ते ब्रम्हपुरीरोड येथे वाहनचालक चव्हाण शासकीय वाहनासह आले. त्यांनी मित्र प्रदिप चव्हाण यांच्या     समोरच  2000 रुपये स्वीकारले. यावेळी सुरु असणार्‍या देवाण-घेवाणचे मोबाईलवर व्हिडिओ  चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पोलिस वाहनचालक चव्हाण रंगेहाथ लाचेची रक्कम स्वीकारत  असल्याचे दिसत आहे. ‘पुढारी’ने हा व्हिडीओ लोकांसमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस हवालदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन तत्काळ त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी रोहन पवार यांनी केली आहे.