Wed, Jul 17, 2019 12:35होमपेज › Satara › पोलिसांना मारहाण प्रकरणी दोघांना अटक

पोलिसांना मारहाण प्रकरणी दोघांना अटक

Published On: May 03 2018 4:20PM | Last Updated: May 03 2018 4:19PMसातारा : प्रतिनिधी

 प्रतापपूर, ता. जत, जि. सांगली येथे लपून बसलेल्या, मोक्का गुन्ह्यात हव्या असलेल्या दत्ता जाधव याचा पोलिस शोध घेत होते. दरम्‍यान खबर्‍यांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार त्‍याला  पकडण्यासाठी गेलेल्या सातारा व सांगली पोलीस पथकावर तुफान दगडफेक करून तो पुन्हा पळून जाण्यात यशस्‍वी झाला होता. जिवे मारण्याचा गुन्हा दाखल असलेल्या या दोघांना आज सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने प्रतापसिंह नगरमधून अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा येथील नामचीन गुन्हेगार दत्तात्रय रामचंद्र जाधव उर्फ दत्ता याच्यावर सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध सावकारी प्रकरणात दत्ता जाधवचे नाव आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. तेव्हापासून दत्ता जाधव हा सातार्‍यातून फरार होता. त्याच्या तपासासाठी पोलीस पथके महाराष्ट्रभरात शोध घेत होती. असे असताना दि. 25 एप्रिल रोजी दत्ता जाधव हा आपल्या सहकार्‍यांसमवेत प्रतापपूर, ता. जत, जि. सांगली येथे असल्याची खात्रीशीर माहिती खबर्‍यांमार्फत सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सातारा पोलिसांनी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलीस पथक तयार केले होते.

25 एप्रिल रोजी या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने प्रतापपूर येथे छापा मारला. त्यावेळी दत्ता जाधव व त्याच्या सोबत असलेल्या शेकडो स्त्री व पुरुषांनी पोलीस पथकावर तुफान दगडफेक करून पोलिसांना जखमी केले होते. त्या रात्री प्रतापपूर येथे गावची यात्रा होती, तसेच तमाशाचा कार्यक्रमही सुरू होता. याचा फायदा घेवून दत्ता जाधवने त्या ठिकाणावरून पोबारा केला होता. दत्ता जाधवचा लहान भाऊ युवराज जाधव व त्याच्या सहकार्‍यांनी दत्ता जाधव याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी अटक करण्यास गेलेल्या पालिसांवरच दगड, मिरची पावडर, घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. यात अनेक महिला व पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. शेवटी पोलीस दलाने बळाचा वापर करीत युवराज जाधव व त्याच्या सहकार्‍यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणातील दत्ता जाधवसह अनेक गुन्हेगार अद्यापपर्यंत फरार आहेत. यातील दोन आरोपी प्रतापसिंह नगर येथे आल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार आज पोलिसांनी प्रतापसिंह नगर येथे सापळा रचून दीपक अण्णा लोंढे व धनराज उर्फ धनू ज्ञानदेव बडेकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर जत पोलीस ठाण्यामध्ये मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता जाधव अजून फरार आहे. तो प्रतापसिंह नगरातच असल्याची अटकळ पोलिसांनी बांधली आहे. मात्र, दत्ता जाधव एवढे दिवस पोलिसांना मिळून येत नसल्यामुळे सातारा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दत्ताचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रतापसिंह नगरातून होवू लागली आहे.