होमपेज › Satara › धरणांमुळे हरितक्रांतीला ‘अच्छे दिन’

धरणांमुळे हरितक्रांतीला ‘अच्छे दिन’

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 8:09PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण तालुक्यातील कोयना धरणाने निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची सिंचनाची गरज भागवली तर पूर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यालाही गरजेनुसार पाणी दिले. या धरणासह याच तालुक्यातील तारळी, मोरणा  (गुरेघर), उत्तरमांड, वांग (मराठवाडी) यासह अगदी छोट्या निवकणे, बीबी, साखरी अशा धरणांमुळे हरितक्रांतीला अच्छे दिन आले आहेत. यापैकी काही धरणांची कामे अद्यापही शेवटच्या टप्प्यात अपूर्णावस्थेत असलीतरी ज्यावेळी ती पूर्ण होतील त्यावेळी पाटण तालुक्याबरोबरच पूर्वेकडील तालुकेही निश्‍चितच सुजलाम सुफलाम होतील यात शंकाच नाही. 

पाणी असो वा वारा त्यावरही वीजनिर्मिती करत दुसरीकडे त्याहीपेक्षा सिंचनाची गरज भागविण्यात पाटण तालुक्याने नेहमीच धन्यता मानली आहे. येथील भूमिपुत्रांच्या वाट्याला सुख आले की दुःख याची कोणतीही पर्वा या स्थानिक भूमिपुत्रांनी कधीच केली नाही. केवळ त्याग आणि दातृत्वाच्या भावनेतून स्वतः अंधारात राहून इतरांच्या जीवनात प्रकाश टाकला. तर स्वतःच्या तहानेपेक्षाही इतरांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. कोयना धरणातील पाण्यावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. तर याच तालुक्यातील पूर्वेकडील नदीकाठचा परिसर याच कोयना माईने हिरवागार केला. मध्यंतरीच्या काळात याच तालुक्याचे भाग्यविधाते मानले जाणार्‍या राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नाने मग अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांना मंजुरी व गतीही मिळाली. तालुक्यात तारळी, मोरणा (गुरेघर), उत्तरमांड, वांग (मराठवाडी) यासह अगदी छोट्या निवकणे, बीबी, साखरी अशा धरणांपैकी अनेक ठिकाणची कामे निधीअभावी अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र बहुतांशी ठिकाणी पाणी अडविले गेल्याने मग नैसर्गिक नियमाने त्याठिकाणच्या जमिनींना न्याय मिळाला आहे. शेत जमीनीला चांगला भाव वाढला आहे. तर पूर्वी डोंगर उतार, भौगोलिकदृष्ट्या अडचणीची व केवळ पावसावर अवलंबून असणारी पारंपरिक भात अथवा नाचना शेती आता नवनव्या प्रगतीकडे झेपावत आहे. आणि मग यातूनच ऊस, भाजीपाला, फळे अशा उत्पादनांकडे शेतकरी वळू लागला आहे. 

यापूर्वी पडीक, नापिकी जमिनींवर या ना त्या प्रकारे नवनवीन प्रयोग करण्याच्या दृष्टीने नव्या पिढीलाही प्रोत्साहन मिळू लागल्याने मग सुशिक्षित, बेरोजगारीवर मात करत शहराकडे रोजगारासाठी जाणारा लोंढाही आता बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे, ही निश्‍चितच समाधानाची बाब आहे. तर सध्या केवळ तालुक्याचा विचार करता भलेही काही शेकडो एकर शेती ओलिताखाली असेल मात्र ज्यावेळी याच तालुक्यातील सर्वच धरणांची कामे पूर्ण होतील त्यावेळी मग हजारो एकर शेती ओलिताखाली येवून कधी काळी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त म्हणून हिणवलेल्या याच तालुक्याला व पर्यायाने याच लाभक्षेत्रातील भूमिपुत्रांना अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकेच महत्त्वाचे.