Fri, Jun 05, 2020 11:42होमपेज › Satara › सातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान

सातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान

Published On: Sep 24 2019 10:21AM | Last Updated: Sep 24 2019 10:34AM
सातारा : पुढारी ऑनलाईन

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. या पोटनिवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात पोटनिवडणूक होत आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये गेल्या शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नव्हता. यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक आयोगाने साताऱ्यातील निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्‍ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. याचवेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ५ ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ७ ऑक्टोबर आहे. मतदान २१ ऑक्टोबरला होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.