Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Satara › पार्किंग आले रस्त्यावर; सुरक्षा वार्‍यावर

पार्किंग आले रस्त्यावर; सुरक्षा वार्‍यावर

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:16PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

सातार्‍यातील पार्किंगचा बोजवारा अनेक समस्यांचे मूळ बनला आहे. शहरातील यादोगोपाळ पेठेतील कला वाणिज्य  चौकात रस्त्यावरच 4 ते 5 ट्रकसह अनेक वाहने अनधिकृतपणे पार्किंग केलेली असतात. परिसरात हायस्कूल असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बर्‍याच वेळा येथे अपघाताचे प्रकारही घडलेले आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.

सातार्‍यातील वाहतूक कोंडी डोकेदुखीचा विषय बनला आहे. ठिकठिकाणी पार्किंगचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक इमारतींचे पार्किंग गळपटल्यामुळे वाहने रस्त्यावर येत आहेत. शहरातील यादोगोपाळ पेठेत असलेल्या कला वाणिज्य चौकातून कास, परळी मार्गाकडे जाणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते.  या चौकात वाहनांची रेलचेल नेहमीच पहायला मिळते. मात्र या चौकात दररोज चार ते पाच ट्रकधारक अनधिकृतरित्या आपली वाहने पार्क करतात. 

याच भागात प्राथमिक मराठी शाळा असल्यामुळे तेथे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अनेक वेळा तेथे अपघाताचे प्रसंगही घडले आहेत.  सायंकाळच्या वेळेस तर सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण होते.

रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग बंद केली तर वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. परंतु त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनधिकृत पार्किंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची गरज नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. शहरात अनेक ठिकाणी याच स्वरूपाच्या पार्किंगच्या समस्या आहेत. वाहतूक विभागाची क्रेनने पाठ फिरवताच पुन्हा जैसे  थे परिस्थिती पहायला मिळत आहे.