होमपेज › Satara › म’श्‍वरमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

म’श्‍वरमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 10:57PMपाचगणी/महाबळेश्‍वर : वार्ताहर

प्रेम विवाहाला मान्यता मिळणार नाही व दोन्ही कुटुंबामध्ये भांडणे लागतील या भीतीने पलूस, जि. सांगली येथील प्रेमीयुगुलाने महाबळेश्‍वर येथील केटस् पॉईंटच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी या दोघांनी लग्नही केले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अविनाश आनंदा जाधव (वय 27) व सौ. तेजश्री अविनाश जाधव  (23, दोघेही रा. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली) अशी आत्महत्या केलेल्या युगुलाची नावे आहेत. तेजश्रीचे लग्नापूर्वीचे नाव तेजश्री रमेश नलवडे असे होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अविनाश आणि तेजश्री हे रविवारी सकाळी महाबळेश्‍वर येथे आले होते. या दोघांनी महाबळेश्‍वर फिरण्यासाठी सकाळी वसंत जाधव   यांची टॅक्सी भाड्याने केली होती. केटस् पॉईंट येेथे गेल्यानंतर हे दोघे शेजारील जंगलात फिरायला गेले. मात्र, बराच वेळ दोघेही परत न आल्याने जाधव यांनी आपल्या मित्रांसमवेत या दाम्पत्याचा शोध घेतला असता झाडीत काही अंतरावर दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेले दिसले. या प्रकारानंतर जाधव यांनी याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात खबर दिली.  

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले. सॅकमध्ये तेजश्रीचे आधार कार्ड व अविनाश याचे पॅन कार्ड सापडले. यामुळे त्यांची ओळख पटली. या साहित्याबरोबरच पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये  आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो. आमच्या आत्महत्येप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. अविनाश हा सांगलीतील मानसिंग सहकारी बँकेत कर्मचारी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी 1सांगितले. या घटनेची नोंद पाचगणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.