Thu, Sep 20, 2018 00:50होमपेज › Satara › पाचगणीत पिवळ्या जर्द फुलांचे गालिचे

पाचगणीत पिवळ्या जर्द फुलांचे गालिचे

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 9:35PMभिलार : मुकुंद शिंदे

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीत सध्या रंगीबेरंगी फुलांचा मोसम सुरू झाला आहे. तेरडा, भारंगी, चवेणी तसेच मिकीमाऊस यासह विविध फुलांमुळे हा परिसर बहरला आहे. विविध रंगी फुलांनी बहरलेला परिसर पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. आल्हाददायक वातावरणामध्ये फुलांच्या गालीचाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.

पाचगणी परीसरातील डोंगररांगा विविध रंगांच्या फुलांनी बहरल्या आहेत. ऊन पावसाचा खेळ डोंगर दर्‍या मधून वाहणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडणारे इंद्रधनुष्य दर्शन, धुके, हिरवा शालू परिधान करत आपल्या विविध आविष्काराचे मुक्त हस्त पणे उधळण करत पाचगणी महाबळेश्‍वरचा परिसर निसर्गाच्या विविध छटानी उधळून गेला आहे.

या परिसरातील पठारांवर चवेणी, एरिअकोलाँनची पांढरी, काँमेललिना आणि युट्रिक्यूलेरियाची निळी-जांभळी फुले, लांब दांड्याची क्लोरो कायरम, हबेणारीया, भारंगी, सोनपिवळी, सोनकी, गुलाबी फुलांचा तेरडा बालभड ठिपके असणारे कौला अशा विविध जातींच्या फुलांनी सजला आहे. अशी ही फ्लावर व्हॅली रंगसंपदा विद्यार्थ्यांसाठी चालती बोलती प्रयोगशाळा बनली आहे. पर्यटक व वनस्पती अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.  निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या गर्द हिरवाईत लाल, निळ्या, पिवळ्या तसेच पांढर्‍या रंगाची विविध जातींची फुले दिसत आहेत. निसर्गाच्या या देखण्या रुपाला न्याहळण्यासाठी व डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी डोंगररांगांवर पर्यटक विद्यार्थी व निसर्ग प्रेमींची गर्दी होत आहे. पाचगणी व भिलार परिसरात सध्या पाऊस पडत असल्याने विविध रंगांची फुले, वेली वनस्पती बहरू लागल्या आहेत.