Mon, Feb 17, 2020 23:31होमपेज › Satara › जुना आरटीओ ऑफिस चौक ‘डेंजरझोन’ 

जुना आरटीओ ऑफिस चौक ‘डेंजरझोन’ 

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:24PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

विस्तारणार्‍या सातारा शहर व उपनगरात अनेक ठिकाणे धोकादायक बनू लागली असून पुन्हा आरटीओ ऑफिस चौकही असाच डेंजर झोन होवू लागला आहे. मध्यवर्ती बसस्थानक शाहू स्टेडियममार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जाताना लागणारा हा चौक साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. दरम्यान, येथील उपाययोजनांबाबत संबंधित यंत्रणेकडून कोलदांडा दिला जात असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून होत आहेत. 

सातारा शहरात अनेक अपघातग्रस्त ठिकाणे आहेत. त्यामध्ये जुन्या आरटीओ ऑफिसशेजारील हा चौेक अपघाताला कायमच निमंत्रण देऊ लागला आहे. येथील धोकादायक वळण वाहनचालकांची मती गुंग करत आहे. अरुंद रस्ता व त्यावरील अचानक लागणारे वळण हे वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनले आहेत.  या यू आकाराच्या वळणावर वाहनांची व नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ सुरु असते. 

या ठिकाणी सुरक्षित वाहतुकीच्या संदर्भात कोणत्याच उपाययोजना नसल्याने हे वळण दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे. काळानुसार वाहनांची वाढती संख्या व वेग पाहता वाहनचालकांच्या सुरक्षेतेची दक्षता व सुविधा उपलब्ध करुन देणे संबंधित विभागाचे  कर्तव्य आहे. 

पण गेल्या अनेक वर्षापासून याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या वळणावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रिमांड होम, जरंडेश्‍वर नाका, सदरबझार, पोवईनाका, मध्यवर्ती बसस्थानक, करंजे  या बाजूकडून येणारी असंख्य वाहने या वळणावरील चौकात एकत्र येत असतात. मात्र, येथील वळण यू आकाराचे असल्यामुळे अनेकांना वाहनांचा अंदाज येत नाही. त्यातून वेग नियंत्रित न झाल्यास अपघात घडत आहेत. 

अनेकदा वाहनचालकांमध्ये वादावादी होत असते. या ठिकाणी प्रबोधन फलक, स्पीड ब्रेकर, सिग्नल यंत्रणा उभी करावी, अशी मागणी  वाहन चालकांकडून अनेक वेळा  होत असते. भविष्यातील धोका टाळण्यासाठी या ठिकाणी सुरक्षितेचे उपाय झाले तर मनुष्यहानी टाळता येईल. मात्र, याबाबत उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. येथील वाहतूक डेंजर झोन बनल्याने अनेकांना या ठिकाणावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच जावे लागत आहे.