Sun, Oct 20, 2019 22:51होमपेज › Satara › सातारा : अंबा बैसली सिंहासनी..!

सातारा : अंबा बैसली सिंहासनी..!

Published On: Sep 30 2019 1:53AM | Last Updated: Sep 29 2019 10:35PM
मांढरदेव : वार्ताहर

लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तिर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वाई  व भोरपासून सुमारे बावीस ते चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मांढरदेव हे गाव वाई व भोरपासून सुमारे 22 ते 24 किलोमीटर अंतरावर असून मांढरगडावरील आई काळूबाईचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मांढरगडावरील काळूबाई देवीचा महिमा अलौकिक आहे. अंदाजे 350 वर्षापूर्वीचे हेमांडपंथी बांधकाम असलेले पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा अंर्तगाभारा, गाभारा व सभामंडप असे तीन भाग आहेत. सभामंडपाचे बांधकाम 18व्या शतकात झाले. 

काळेश्‍वरीची मूळ तीन रुपे आहेत. यामध्ये पहिले उग्ररुपी तामस कोलकत्ता, दुसरे सत्व रुप ते गुजरात येथील पावागड येथे तर तिसरे राजसरुप हे मांढरदेव येथे पहायला मिळते. घटस्थापना, ललिता पंचमी, अष्टमी, नवमी व दसर्‍याला देवीच्या दर्शनासाठी यात्रेला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून भाविक येतात. मंगळवार, शुक्रवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमेला दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. 

देवीची माहिती व महती

या देवीचे मूळ नाव काळूबाई (काळेश्‍वरी) असून ती काळूआई, मांढरदेवी या नावाने ओळखली जाते. काळेश्‍वरी याचा अर्थ जी काळची ईश्‍वर आहे ती किंवा काळाला नियंत्रित करणारी शक्ती ती काळेश्‍वरी. शैव व शाक्त पंथियांमध्ये या स्थानाला विशेष महत्व आहे. नवसाला पावणारी, कार्य सिद्धिस नेणारी, भक्तांवरील संकटात त्वरेने धावून येणारी अशी काळूबाईची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा बांधण्यात येते. नवरात्र कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र उघडे असते. नवरात्रोत्सवात पाचव्या व सातव्या माळेला विशेष महत्व आहे.